सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या भाषणांचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना आळशी समजत असल्याचे ते म्हणाले. मात्र, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी खरंच भारतीयांना आळशी म्हटलं होतं का? पंतप्रधान मोदी यांनी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कोणत्या भाषणाचा उल्लेख केला? आणि त्या भाषणात नेहरू आणि इंदिरा गांधी नेमकं काय म्हणाल्या होत्या? याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : मोबाइल फोन खरोखर किती स्वस्त होणार? सुट्या भागांच्या आयात शुल्कात कपातीचा लाभ ग्राहकांना किती?
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी घराणेशाहीचा आरोप करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी पंडित नेहरू यांच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर दिलेल्या भाषणांचाही उल्लेख केला. “भारतीयांना अधिक मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात. त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे, असं नेहरू म्हणाले होते. याचाच अर्थ नेहरू भारतीय नागरिकांना आळशी समजत होते”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी इंदिरा गांधी यांच्या भाषणाचाही उल्लेख केला. “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही विचारसरणी वेगळी नव्हती. त्यांनी एका भाषणात म्हटले होते की, ‘आपली कामं पूर्णत्वास जातात तेव्हा आपण आत्मसंतुष्ट असतो आणि जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण नाऊमेद होतो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे.’ आजच्या काँग्रेसकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील लोकांचे आकलन चुकीचे केले असेल, पण काँग्रेसबाबत त्यांचे आकलन अचूक होते, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच काँग्रेसच्या राजघराण्यातील लोक देशवासियांबद्दल काय विचार करतात, हे या दोन उदाहरणांवरून लक्षात येईल. विशेष म्हणजे आजही त्यांचे विचार तसेच आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या कोणत्या भाषणाचा उल्लेख केला?
पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरूंच्या ज्या भाषणाचा उल्लेख केला, ते भाषण नेहरूंनी १९५९ साली स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून दिले होते. स्वातंत्र्यानंतरच्या १२ वर्षांनंतर दिलेल्या भाषणात त्यांनी भारतीयांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले होते. “सरकारी अधिकारी नागरिकांच्या मदतीसाठी तयार आहेत, मात्र कोणताही समाज फक्त अधिकाऱ्यांच्या मदतीने पुढे जात नाही, तर स्वत:च्या मेहनतीने पुढे जातो”, असे ते म्हणाले होते. पुढे बोलताना त्यांनी विकसित राष्ट्रांचे उदाहरणही दिले. ते म्हणाले, “भारतीयांमध्ये कष्ट करण्याची सवय नाही, यात आपला दोष नाही, वेळेनुसार माणसाच्या सवयी तयार होतात. पण, वस्तुस्थिती अशी आहे की आपण युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेतील लोकांइतके कष्ट घेत नाही. हे देश एका रात्रीत विकसित झालेले नाहीत, ते कठोर परिश्रम आणि त्यांच्यातील कौशल्यामुळे विकसित झाले आहेत. आपणही कठोर परिश्रम आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करू शकतो”
हेही वाचा – कर्करोगामुळे होणार्या मृत्युंचा आकडा मोठा; कर्करोगाचे प्रमाण वाढण्यामागे नेमकी कारणे काय आहेत?
इंदिरा गांधी त्यांच्या भाषणात काय म्हणाल्या होत्या?
पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींच्या ज्या भाषणाचा उल्लेख केला, ते भाषण १९७४ साली एका सभेत केले होते. त्यावेळी देशात नुकतेच जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरू होते आणि इंदिरा गांधी यांना देशभरातून विरोध होत होता. तेव्हा एका सभेत बोलताना त्या म्हणाल्या, “आज आपला समाज नकारात्मक मानसिकतेतून जात आहे. आपल्या समाजाला या मानसिकतेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी हिंसा आणि आंदोलनं करणे हा उपाय नाही. एकमेकांविरोधात लढूनही आपण आपले लक्ष्य साध्य करू शकत नाही. नक्कीच सरकारच्या काही जबाबदाऱ्या आहेत, पण प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडावी. काळ्या बाजारातून वस्तू खरेदी न करणे, आपली शहरे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण, दुर्दैवाने आपली कामं पूर्णत्वास जातात तेव्हा आपण आत्मसंतुष्ट असतो आणि जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण नाऊमेद होतो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की हिंमत हारू नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे.”