काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधया यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. यावेळी मध्य प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून त्यांनी काँग्रेसची कानउघडणी केल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंचे कर्ज माफ झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच  काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही, त्यांनी सांगितले होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. राज्यात काँग्रेसचं सरकार निवडून आलं तर, १० दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं ते म्हणाले होते. मात्र अद्यापर्यंत येथील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेश काँग्रेसला सुनावले असल्याचे दिसत आहे.

सिंधिंया यांनी म्हटले की, शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंचे कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले गेले नाही. केवळ ५० हजार रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ केले गेले आहे, मात्र आपण दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य सिंधिया पक्षातील अंतर्गत मुद्यांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शिवाय, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून त्यांच्यात आणि कमलनाथ यांच्यात रस्सीखेच झाल्याचेही दिसून आले होते. याद्वारे काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद समोर आला होता. दोन दिवसांपूर्वीच सिंधिया यांनी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचेही म्हटले होते.

तर अगोदरही मध्य प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसला त्यांच्याच नेत्यांकडून घरचा आहेर मिळालेला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे भाऊ काँग्रेसचे नेते लक्ष्मण सिंह यांनी देखील मुख्यमंत्री कमलनाथ सरकारवर शेतकरी कर्जमाफीवरून टीका केली होती. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी न झाल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी असेही त्यांनी म्हटले होते.