साखरसम्राटांशी घरोबा केल्याने अडचण?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

उसाच्या दरावरून आतापर्यंत साखर कारखानदारांच्या विरोधात लढणारे राजू शेट्टी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने साखर कारखानदारांच्या साथीने निवडणूक लढवावी लागत आहे. अपरिहार्यता म्हणून ही हातमिळवणी करावी लागली असली तरी शेती आणि शेतमालाला संरक्षण याबाबत आपली भूमिका ठाम असल्याचे शेट्टी यांना स्पष्ट करावे लागत आहे.

लोकसभेच्या शिवारात खासदार राजू शेट्टी यांनी तिसऱ्यांदा पेरणी सुरू ठेवली आहे. शेतकरी कार्यकर्ता ते राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी नेता अशी प्रतिमा निर्माण केलेल्या शेट्टी यांना शिवसेनेशी कडवी लढत द्यावी लागत आहे. स्थानिक प्रश्नांचे मोहोळ त्यांच्या भोवती फिरत असून त्यावरून शेलक्या शब्दांत विरोधक टीकेचे आसूड ओढत आहेत.

शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या मुशीत जडणघडण झालेला कार्यकर्ता अशी राजू शेट्टी यांची प्रारंभीची ओळख. नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वतंत्र मळा निर्माण करून त्यांनी त्याधारे जिल्हा परिषद, विधानसभा, दोनदा लोकसभा निवडणुकीचा फड मारला. आता तिसऱ्यांदा ते लोकसभेच्या शिवारात उतरले आहेत. एव्हाना, त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासातून त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख शेतकरी नेत्यांमध्ये आपली ओळख दृढ केली. याच नेत्याला या निवडणुकीत स्थानिक मुद्दय़ावरून घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे.

हातकणंगले मतदारसंघातील इचलकरंजी हे सर्वात मोठे शहर. या शहराच्या वारणा नळपाणी योजनेत आडकाठी आणली आणि वस्त्रोद्योगाकडे दुर्लक्ष केले या मुद्दावरून शेट्टी यांच्या विरोधात रान उठवले जात आहे. खेरीज, वर्षांतून एकदा साखर कारखानदारांशी संगनमत करून ऊसदराचे आंदोलन उरकायचे, अशी टीका केली जात आहे. मुख्य म्हणजे कालपर्यंत साखर कारखानदारांवर तोफ डागणारे शेट्टी आता त्यांच्या पंगतीला कसे बसले? असा सवाल उमेदवार धैर्यशील माने यांच्यापासून ते त्यांचे जुने मित्र सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत सर्वचजण करत आहेत.

स्वाभाविकच शेट्टी यांना प्रचारावेळी या मुद्दय़ाचे स्पष्टीकरण देणे भाग पडत आहे. खेडोपाडय़ातील बैठकांमध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. ‘शेतकरी हितासाठी मोदी सरकारने भरीव कामगिरी केली नसल्याने त्याचा समाचार घेणे भाग पडले. नव्या राजकीय फेरमांडणीत काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जावे लागले आहे. पण, उद्या काँग्रेसचे सरकार आले तरी शेती, शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्यांचे हित यासाठी संघर्ष करण्यात मागे राहणार नाही, असे ते साखर कारखानदारांना भर सभेत ऐकवत आहेत. यातून शेतकऱ्यांच्या मनातील आपले स्थान बळकट करण्याचा शेट्टींचा प्रयत्न आहे. एकीकडे शेट्टी यांच्यावर सहकार सम्राटांविरोधात बोलताना मर्यादा आल्या असल्या तरी त्यांच्या समर्थकांच्या मताची बेगमी होण्याचा लाभही मिळू शकणार आहे. तो कितपत मिळणार यावर शेट्टी – माने लढतीच्या निकालाचा रंग अवलंबून असणार आहे.

शेट्टी साखर कारखानदारांच्या जवळ गेले असले तरी त्यांच्या संपर्कातील बहुतेक कारखानदारांनी उसाची देयके भरली आहेत. उलट, महायुतीच्या मंचावर असलेले बरेच कारखानदार याबाबत मागे आहेत. त्यामुळे दोन्हीकडे साखर कारखानदार असले तरी त्यातील उडदामाजी काळेगोरे कोण आहेत, याचाही शेतकरी विचार करणार आहे. शेतीसाठी लढणारा नेता कोणती राजकीय भूमिका घेतो यापेक्षा तो आमच्यासाठी आवाज उठवतो, हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे.       -रावसाहेब पुजारी, शेती अभ्यासक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers are important for raju shetty
First published on: 19-04-2019 at 03:43 IST