कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन अजून आक्रमक करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी शेतकरी आंदोलकांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ ते ४ असे चार तास हे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी १२ फेब्रुवारीपासून राजस्थानाच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करु न देण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.

दुसरीकडे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषवरील चर्चेदरम्यान कृषी कायद्यांवर भाष्य केलं. “आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरु आहे तेथील शेतकरी चुकीची माहिती आणि अफवांना बळी पडले आहेत. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करतं. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. आदर आणि सन्मानाने करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

“कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडई, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगताच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.

“आधी जे हक्क, व्यवस्था होत्या त्या नवीन कायद्यांनी काढून घेतलं आहे का हे शेतकऱ्यांनी सांगावं. पर्याय असताना विरोध का सुरु आहे. जिथे जास्त फायदा तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. या कायद्यात कोणतंही बंधन नसून पर्याय आहेत. जर कायदा लादला असेल तर विरोध करु शकतो,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers protest rail roko on february 18 for 4 hours sgy
First published on: 10-02-2021 at 22:03 IST