Faridabad : देशात दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत असल्याचं पाहायला मिळतं, खरं तर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ धोकादायक असते. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. गोळीबार, हाणामारी, खून, दरोडा, लैंगिक अत्याचार अशा अनेक घटना देशात रोज अनेक ठिकाणी घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता हरियाणाच्या फरीदाबादमध्ये अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

फरिदाबादमधील एका व्यक्तीने आपल्या सुनेवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सुनेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरासमोरील खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या घटनेमध्ये संबंधित महिलेच्या पतीचा देखील सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे फरीदाबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

नेमकं घटना काय घडली?

फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेचं जुलै २०२३ मध्ये लग्न झालं होतं. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर तिचा तिच्या सासरच्या कुटूंबीयांकडून छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, त्यानंतर २१ जून रोजी तिचा मृतदेह तिच्या सासरच्या घराबाहेर १० फूट खोल खड्ड्यात टाकलेल्या काँक्रीट स्लॅबखाली गाडलेल्या स्थितीत आढळून आला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सासऱ्याने चौकशीदरम्यान या गुन्ह्याची कबुली दिली असून सासरा पोलीस कोठडीत आहे. महिलेच्या हत्येचा कट १४ एप्रिल रोजी रचण्यात आला होता. तसेच या कटाच्या योजनेचा एक भाग म्हणून तिच्या सासूला उत्तर प्रदेशातील एटा येथे एका लग्नात सहभागी होण्यासाठी देखील पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर २१ एप्रिलच्या रात्री महिलेच्या पतीने पत्नीला आणि त्याच्या बहिणीला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर दोन्ही महिला बेशुद्ध पडल्या.

सासऱ्याच्या कबुलीनुसार त्यानंतर तो रात्री उशिरा सुनेला मारण्याच्या उद्देशाने खोलीत गेला आणि सुनेचा खून करण्यापूर्वी त्याने बेशुद्ध सुनेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच सासऱ्याने हे कृत्य त्याच्या पत्नीला किंवा मुलाला सांगितलं नव्हतं, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच त्यानंतर सासऱ्याने मुलाला बोलवत त्यांनी दोघांनी मिळून महिलेचा मृतदेह गुंडाळला आणि घराबाहेर रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पुरला. त्यानंतर तो खड्डा विटा टाकत त्यावर काँक्रीटचा स्लॅब टाकण्यात आला. पण सांडपाण्याच्या कामासाठी हा खड्डा खोदल्याच्या कारणामुळे शेजाऱ्यांना याबाबत काही संशय आला नाही.

दरम्यान, या घटनेनंतर २५ एप्रिल रोजी सासऱ्याने सुनेची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांना तपासादरम्यान संशय आला आणि पोलिसांनी तो खड्डा पुन्हा खोदला असता संबंधित महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळून आला आणि सर्वांना धक्का बसला. यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून यामध्ये सासरे, सासू, पती आणि वहिनीचा समावेश असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, तिच्या बहिणीला लग्नानंतर सतत छळ सहन करावा लागला. लग्नाच्या काही महिन्यांतच ती तिच्या आईवडिलांच्या घरी परतली होती. मात्र, त्यानंतर ती पुन्हा सासरी गेली होती. बहिणीने असाही दावा केला की सासरचे लोक हुंड्यामुळे नाराज होते आणि लग्नाच्या सुरुवातीपासून तिच्यावर अधिक पैसे आणि भेटवस्तूंसाठी दबाव आणत होते. बहिणीच्या या आरोपांची देखील पोलीस चौकशी करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.