Chirag Paswan Big Attack: एनडीएतील घटकपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शनिवारी आपल्याच सरकारला घेरले. बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार काम करत आहे. या सरकारला लोजप (रामविलास) पक्षाचाही पाठिंबा आहे. मात्र गेल्या काही काळापासून बिहारमध्ये एकापेक्षा एक भयंकर अशा गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. या घटनांवरून बिहार सरकारवर विरोधक टीका करत आहेत. वर्षअखेरीस बिहारमध्ये निवडणूक होणार असल्यामुळे ही टीका सरकारसाठी त्रासदायक ठरणार आहे. आता सरकारमधीलच घटकपक्ष उघडपणे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.
बिहारमधील बोधगया येथे होमगार्ड भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका तरुणीवर रुग्णवाहिकेतच चालक आणि तंत्रज्ञांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. भरतीसाठी आलेली तरूणी बेशुद्ध पडल्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून नेत असताना सदर गुन्हा घडला. या घटनेनंतर आता बिहारच्या कायदा व सुव्यवस्थेवर टीका होत आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “बिहारमध्ये एकामोगा एक गुन्ह्यांच्या घटनांची मालिका सुरू झाल्यासारखे वाटते. प्रशासन गुन्हेगारांसमोर पूर्णपणे नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. रुग्णवाहिकेत घडलेल्या बलात्काराची घटना निषेधार्ह आहे. या घटनेत कारवाई झाली. पण अशी घटना घडतेच कशी? असा प्रश्न मला पडला आहे.”
“बिहारमध्ये हत्या, अपहरण, लूटमार, दरोडा, बलात्कार असे गंभीर गुन्हे एकामागोमाग घडत आहेत. गुन्हे रोखण्यात पोलीस प्रशासन हतबल आणि अपयशी दिसत आहे. जर असेच सुरू राहिले तर काही काळानंतर राज्यात भयावह परिस्थिती निर्माण होईल. मी तर म्हणेन अशी परिस्थिती आताच ओढवली आहे. निवडणुकीमुळे जर समाजकंटक अशाप्रकारे घटना मुद्दामहून घडवून आणत असतील किंवा सरकारला बदनाम करण्यासाठी या घटना घडत असतील, असे मानले तरीही यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी तर गृहखात्याचीच आहे”, असा मुद्दा चिराग पासवान यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, कोणताही गुन्हेगार राजरोसपणे गुन्हे कसे काय करू शकतो? पोलीस प्रशासन काय करत आहे? एकतर पोलीसच या घटनात सामील आहेत किंवा त्या घडलेल्या घटनांवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मग प्रशासनच कुचकामी ठरलेले आहे. मी बिहार सरकारला पुन्हा सांगू इच्छितो की, वेळ गेलेली नाही. त्यांनी कायदा व सुव्यवस्था पुन्हा चोख करावी. अन्यथा अशा सरकारला पाठिंबा दिल्याचे मला दुःख वाटेल. गुन्हेगारीवर नियंत्रण आणावेच लागेल. नाहीत यापेक्षा कठीण परिस्थिती बिहारमध्ये उद्भवेल.