सोशल मिडिया जितक्या सोयीची ठरते तितकेच काही वेळेस चांगलीच अंगाशीही येते. सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या काही आक्षेपार्ह छायाचित्रांमुळे आणि व्हिडिओंमुळे अनेकजणांना चांगल्याच निंदेला तोंड द्यावे लागले असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तशीच काहीशी घटना एका रशियन तरुणीसोबत घडली आहे. रशियाच्या मॉस्को या शहरात राहणाऱ्या एका तरुणीला सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करणे चांगलेच भोवले आहे. पोलिस दलात काम करणाऱ्या २६ वर्षीय क्रिस्टीना नामक तरुणीने हा व्हिडिओ फेसबुकवरच्या एका खाजगी ग्रुपवर शेअर केला होता. क्रिस्टीनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ अश्लिल वाटला आणि याच कारणाने त्यांनी क्रिस्टीनाला नोकरीवरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावर झालेल्या या कारवाईबद्दल सांगताना ‘मी कामातील शिस्त मोडत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे असे माझ्या वरिष्ठांना वाटते, पण या व्हिडिओमध्ये काहीच अश्लिल नव्हते’ असे ती म्हणाली. अगदी सहजच हा व्हिडिओ आपण शेअर केला असून त्यामागे कोणताही वाईट उद्देश नव्हता असे स्पष्टीकरणही क्रिस्टीनाने दिले आहे. या एकंदर प्रकारामुळे आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेने क्रिस्टीना त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याविरोधात रितसर तक्रार दाखल करत कोर्टाकडून या प्रकरणी दाद मागणार आहे.