प्रदीर्घ, व्यापक आणि सातत्यपूर्ण कारवाईचा पंतप्रधानांकडून इशारा

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय शेवट नव्हे, तर काळ्या धनाविरुद्धच्या प्रदीर्घ, व्यापक आणि सातत्यपूर्ण लढाईचा प्रारंभ असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. यावरून पुढील काळामध्ये सरकार आणखी धक्के देणार असल्याचे दिसते आहे.

अधिवेशन काळामध्ये दर मंगळवारी सकाळी होणाऱ्या भाजप खासदारांच्या बैठकीमध्ये मोदी बोलत होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे अनेक पैलू खासदारांना समजावून सांगितल्यानंतर मोदींचे छोटेखानी भाषण झाले. त्यामध्ये काळ्या धनाविरुद्धच्या व्यापक लढाईला आता कुठे प्रारंभ झाल्याची टिप्पणी त्यांनी केली. त्यानंतर नोटाबंदीच्या निर्णयाला भाजप खासदारांचा एकमुखी पाठिंबा असल्याचा ठराव अधिकृतपणे केला गेला. या निर्णयाने भाजप खासदारांमध्ये चलबिचल असल्याची चर्चा खोडून काढण्यासाठी ठराव केल्याचे समजते. यावेळी सर्व खासदारांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या धाडसी निर्णयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले.

बँकांसमोरील रांगांवरून विरोधकांनी घेरलेले मोदी म्हणाले, ‘स्वत:साठी व निकटवर्तीयांच्या कल्याणासाठी नव्हे, तर गरीबांसाठी काम करण्याच्या इराद्याने आपण सत्तेवर आलो आहोत. गेल्या ७० वर्षांपासून काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचाराला देश तोंड देत आहे. त्याचा सर्वाधिक फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसतो. म्हणून तर या आर्थिक राक्षसाला रोखण्याची वेळ आली आहे. आपल्याला त्याविरोधात प्रदीर्घ, व्यापक, खोलवर आणि सातत्यपूर्ण लढाई सुरू करावी लागेल. म्हणून नोटाबंदी हा काही शेवट नाही. लढाई आता कुठे तरी चालू झाली आहे.’

तत्पूर्वी जेटलींनी नोटाबंदीचे आर्थिक फायदे खासदारांना समजावून सांगितले. ‘सध्या दरवर्षी चार ते पाच लाख कोटी रुपयांचे कर्जे आपण काढतो, ते जुनी देणी फेडण्यासाठी. पण आता बराचसा काळा पैसा अधिकृत झाल्याने करमहसूल वाढेल आणि आपण चार-पाच लाख कोटींएवढी भलीमोठी रक्कम ग्रामविकास आणि शेतीसाठी खर्च करू शकू. त्याचबरोबर कर्जे स्वस्त होतील, खासगी गुंतवणुकीला चालना मिळेल, महागाईला आळा बसेल आणि स्वच्छ आणि निकोप अर्थव्यवस्थेकडे आपण पावले टाकू. काही काळ त्रास होईल. पण या ऐतिहासिक निर्णयाचे दीर्घकालीन फायदे होतील,’ असे ते म्हणाले.

मोदींना जनतेकडून जाणून घ्यायचीत दहा प्रश्नांची उत्तरे..

  • देशामध्ये काळा पैसा आहे, असे वाटते का?
  • भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या राक्षसाला लढाईत पराभूत करण्याची खात्री वाटते?
  • काळ्या पैशांविरुद्ध सरकारने आतापर्यंत केलेल्या कारवाईबद्दल काय वाटते?
  • भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारने आतापर्यंत केलेल्या कारवाईबद्दल काय वाटते?
  • पाचशे व एक हजारच्या नोटा रद्द करण्याबद्दल काय वाटते?
  • नोटाबंदीने भ्रष्टाचार, काळे धन आणि दहशतवादाला आळा घालणे शक्य वाटते का?
  • नोटाबंदीने घरांच्या किमती, उच्च शिक्षण व आरोग्यव्यवस्था सामान्यांच्या आवाक्यात येईल का?
  • नोटाबंदीमुळे होणारा त्रास सहन करण्यास तुमची तयारी आहे का?
  • काही भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते हेच काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादाला समर्थन देत आहेत का? ल्ल  पंतप्रधानांना सांगाव्यात अशा कोणत्या कल्पना आणि सूचना आहेत का?