केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील पक्षांमध्ये झालेल्या गुपकार ठरावावरून टीका करत, या पक्षांना गुपकार गँग असं संबोधलं आहे. एवढच नाहीतर या आघाडीत सहभागी झालेल्यांना राष्ट्रविरोधी देखील म्हटलं आहे. यावर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी अमित शाह यांच्या टीकेला ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. भाजपा सत्तेच्या भुकेसाठी कितीही आघाड्या निर्माण करू शकते, मात्र आम्ही एखादी आघाडी निर्माण केली तर लगेच आम्ही राष्ट्रहितास आव्हान देत असल्याचं बोलल्या जातं. भाजपा रोज राज्यघटनेचा अवमान करत आहे. असं मुफ्ती म्हणाल्या आहेत.

”भाजपाची भारतात फुट पाडून आणि स्वतः रक्षक असल्याचे भासवून, विरोधकांना अंतर्गत आणि काल्पनिक शत्रू दाखवण्याची युक्ती आता जुनी झाली आहे. लव्ह जिहाद, तुकडे – तुकडे आणि आता गुपकार गँग राजकीय वाद-विवादाचा भाग होईल. खरंतर चर्चेचा मुद्दा बेरोजगारी आणि महागाई असायला हवा. आता आघाडीत निवडणूक लढणं देखील राष्ट्रद्रोह झाला आहे. भाजपा सत्तेच्या भुकेसाठी कितीही आघाड्या निर्माण करू शकते, मात्र आम्ही एखादी आघाडी निर्माण करत आहोत तर ते राष्ट्रहिताच्या विरोधात आहे. भाजपाची ही जुनी सवय आहे. अगोदर भाजपा म्हणत होती, तुकडे-तुकडे गँग देशाच्या अखंडतेसाठी घातक आहे आणि आता त्यांनी गुपकार आघाडीला राष्ट्रद्रोही म्हणण सुरू केलं आहे. दुर्देव हे आहे की ही भाजपा आहे जी राज्यघटनेचा दिवसरात्र अवमान करत आहे.” असं मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुपकार ठरावावरून याच्याशी निगडीत असलेल्या पक्षांसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गुपकार गँग ग्लोबल होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी या बाबतची आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी, असं देखील शाह म्हणाले आहेत. तसेच, गुपकार गँगने देशाचा मूड सांभाळला नाही तर लोक त्यांना बुडवतील, असा इशाराही शाह यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”गुपकार गँग ग्लोबल होत आहे! त्यांची इच्छा आहे की परदेशी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करावा. गुपकार गँग भारताच्या तिरंगा ध्वजाचाही अपमान करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कृत्यांना पाठिंबा आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. भारतीय लोकं आता यापुढे आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात कोणतेही अपवित्र ग्लोबल आघाडी सहन करणार नाहीत.” असं अमित शाह यांनी ट्विट केलं आहे.