देशात सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार माजलेला आहे आणि त्याला शिक्षण क्षेत्रदेखील अपवाद नाही. इतर क्षेत्रातील भ्रष्टाचाराप्रमाणेच ही समस्या देखील गंभीर असून यामुळे भारतात कलियुग आल्याचा दावा फीटजी किंवा एफआयआयटीजीईई या संस्थेनी एका जाहिरातीद्वारे केला आहे.

काही संस्था या सरळ निकालच खरेदी करतात. त्यामुळे हुषार विद्यार्थ्यांची शिकार होते. तसेच, त्यांचे निकाल देखील त्यांची गुणवत्ता दाखविण्यास असमर्थ ठरतात. जर तुमचे पाल्य अशा संस्थेमधून आयआयटीसाठी कोचिंग घेत असेल तर सावध राहा तो आत्महत्येच्या वाटेवर आहे असा इशारा फीटजी या संस्थेनी दिला आहे.

प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकळला आहे. प्रत्येक क्षेत्रात दुसऱ्यांचे शोषण करणारे माफियासारखे लोक आणि संस्था आहेत. अशा संस्थांपासून सावध राहण्याचा सल्ला या जाहिरातीतून दिला आहे. या अशा संस्थांमुळेच कोटा हे ठिकाण भारताची आत्महत्येची राजधानी बनल्याचे जाहिरातीतून म्हटले गेले.

देशभरातून हजारो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा या शहरात आयआयटीच्या क्लासेससाठी येतात. काही विद्यार्थी हे यशस्वी होतात तर अनेकांना अपयशाला सामोरे जावे लागते. तेव्हा असे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडतात. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करीत असाल आणि तुमचे मूल अशा क्लासमध्ये असेल तर वेळीच सावध व्हा असा इशारा या जाहिरातीतून दिला गेला आहे. किमान मागील पाच वर्षांचा निकाल तपासूनच एखाद्या क्लासमध्ये प्रवेश घ्या अशी सूचना देखील त्यांनी दिली आहे.
फीटजी या संस्थेद्वारे २५ डिसेंबर रोजी टॅलेंट रिवार्ड एक्जाम घेण्यात येणार आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी लहान वयापासूनच मार्गदर्शन करण्याचे काम ही संस्था करते. त्यामुळेच पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.
आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा म्हणून त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयआयटीचे विद्यार्थी डी. के. गोयल यांनी ही संस्था स्थापन केली आहे.

दरम्यान, स्वतः देखील एक व्यावसायिक शिक्षण संस्था असून दुसऱ्या संस्थांना उपदेशाचे डोस पाजल्यामुळे ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सध्या या जाहिरातीची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.