पीटीआय, अयोध्या : बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने येथे धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाच्या आराखडय़ाला अंतिम मंजुरी दिली. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या पाच एकर जागेवर ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे (आयआयसीएफ) एक मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, समूदाय स्वयंपाकघर आणि ग्रंथालय बांधले जाणार आहे.
अयोध्या विकास प्राधिकरणाद्वारे मंजुरीस विलंब, जमीन वापरातील बदलाच्या प्रकरणांमुळे हे बांधकाम दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होते. अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले, की शुक्रवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत आम्ही अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मंजूर नकाशे ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’कडे काही विभागीय औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुपूर्द केले जातील. ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल. धनीपूर मशिदीचे ठिकाण अयोद्धेतील राम मंदिराच्या ठिकाणापासून सुमारे २२ किलोमीटरवर आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले व सरकारला जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यास आदेश दिले होते.
‘आयआयसीएफ’चे सचिव अतहर हुसेन यांनी सांगितले, की सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर ‘ट्रस्ट’ एक बैठक घेईल व मशिदीच्या बांधकामाच्या योजनेस अंतिम स्वरूप देईल. २१ एप्रिल रोजी संपणाऱ्या ‘रमजान’नंतर ट्रस्टची बैठक होणार आहे. त्यात मशिदीचे बांधकाम सुरू करण्याची तारीख निश्चित केली जाईल. आम्ही २६ जानेवारी २०२१ रोजी मशिदीची पायाभरणी केली. आम्ही तो दिवस निवडला, कारण या दिवशी सात दशकांपूर्वी भारताची राज्यघटना देशात लागू झाली होती. धन्नीपूर मशीद बाबरी मशिदीपेक्षा मोठी असेल. अयोध्येत पूर्वीच्या संरचनेनुसार ती तयार केली जाणार नाही.
मशिदीच्या बांधकामासाठी स्थापण्यात आलेल्या ‘आयआयसीएफ’ ट्रस्टने मशिदीसह एक रुग्णालय, एक सामुदायिक स्वयंपाकघर, एक ग्रंथालय आणि संशोधन संस्था बांधण्याची घोषणा केली. हुसेन यांनी सांगितले, की नियोजित रुग्णालय १४०० वर्षांपूर्वी पैगंबरांच्या शिकवणीनुसार इस्लामच्या खऱ्या मानवतवादी श्रद्धेतून सेवा करेल.