Nirmala Sitharaman on GST: जीएसटीसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयावर आता देशाच्या व्यापारविश्वातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय व सामाजिक वर्तुळातूनही त्यासंदर्भात संमिश्र सूर उमटताना दिसत आहेत. यातील सर्वात महत्त्वाची शंका वा प्रश्न म्हणजे जीएसटीचे दर कमी केल्यामुळे कंपन्यांना होणारा फायदा या साखळीतील शेवटची कडी असणाऱ्या सामान्य ग्राहकापर्यंत पोहोचणार की नाही? याआधीचा अनुभव पाहता कंपन्या स्वत:चा फायदा झाल्यानंतर त्यातला अगदीच थोडा अंश ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. या पार्श्वभूमीवर थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाच यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी त्यावर उत्तर दिलं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीच्या घोषणेनंतर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. यावेळी त्यांना जीएसटीचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यातील संभ्रमाबाबत विचारणा केली असता त्यावर सरकार देखरेख करणार असल्याचं सांगितलं. असा फायदा शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचतोय की नाही याबाबत खुद्द जीएसटी यंत्रणेमध्ये कोणतीही व्यवस्था नसताना आता त्याची खातरजमा कशी केली जाणार आहे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?
फायदा ग्राहकापर्यंत पोहोचण्यावर अर्थविभाग व लोकप्रतिनिधी लक्ष ठेवणार असल्याचं निर्मला सीतारमण म्हणाल्या. “जीएसटीचे दर कमी केल्यानंतर होणारा अतिरिक्त फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल”, असं सीतारमण यांनी सांगितलं. “यासंदर्भात केंद्र सरकारने काम केलं आहे. सुरुवातीचे काही महिने हे फक्त नवे बदल अंमलात येताना देखरेख ठेवण्याचे, शेवटच्या स्तरापर्यंतच्या अंमलबजावणीचे व दिसणाऱ्या समस्यांवर उपाय योजण्याचे असतील”, असं सीतारमण यांनी नमूद केलं.
“मी, माझा विभाग आणि CBIC म्हणजेच सेंट्रल बोर्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेशन अँड कस्टम्स यांच्यावर प्रामुख्याने ही देखरेख करण्याची व योग्य त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी असेल”, असं त्या म्हणाल्या.
सर्वांशी चर्चा करूनच GST मध्ये बदल – निर्मला सीतारमण
दरम्यान, जीएसटीशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करूनच नवे बदल करण्यात आले असून त्यात राज्य सरकारे व उद्योग जगतातील घटकांचाही समावेश आहे, असं निर्मला सीतारमण यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. तसेच, येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटी दरकपातीच्या फायद्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. आम्हाला पूर्ण खात्री आहे की याचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंच पोहोचेल”, असा विश्वास निर्मला सीतारमण यांनी यावेळी व्यक्त केला.
“जर कोणतीही कंपनी हे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवत नसेल, तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. कारण यातून मालाची खरेदी वाढणार आहे. परिणामी कंपन्यांचा नफादेखील वाढेल. उद्योगजगताने आम्हाला हा शब्द दिला आहे की जीएसटी दरकपातीमधून येणारे फायदे सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातील. जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष शेवटच्या स्तरावर वस्तूंची दरकपात होते की नाही? यावर लक्ष ठेवण्यासाठी खासदारदेखील जबाबदारी घेऊ लागले आहेत”, असंही निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं.