कार्ड पेमेंट करण्यासाठी चार अंकी पिन (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) क्रमांक लक्षात असणे गरजेचे असते. बरोबर पिन क्रमांक टाकला तरच पेमेंट होते. आता लवकरच नेक्स्ट जनरेशन बायोमॅट्रिक कार्ड लाँच केला जाणार आहे. यामध्ये फक्त अंगठ्याच्या मदतीने आपल्याला पेमेंट करता येईल. नव्या कार्ड्समध्ये चिप टेक्नॉलॉजीला फिंगरप्रिंटशी (बोटांचे ठसे) जोडण्यात आले आहे. यामुळे मॉल किंवा एखाद्या दुकानात खरेदी करताना कार्डधारकाची ओळख प्रमाणित होईल. सध्या दक्षिण आफ्रिकेत या नव्या कार्ड्सची दोन टप्प्यात चाचणी घेण्यात आली आहे.
नव्या पद्धतीमुळे कार्ड पेमेंट करणे सोपे जाणार असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. युरोप आणि आशिया खंडात येत्या काही महिन्यात याची चाचणी होऊ शकते. येत्या वर्षभराच्या आत अमेरिकेत या तंत्राचा वापर सुरू होईल, अशी माहिती ग्लोबल पेमेंट आणि आर्थिक सेवा पुरवणाऱ्या मास्टरकार्ड कंपनीने म्हटले आहे.

मास्टरकार्डवरून दर मिनिटाला ६५ हजार व्यवहार केले जातात. नव्या तंत्रात चार अंकी पिन नमूद करण्याची गरज भासणार नाही. पेमेंट कार्डवर बायोमॅट्रिक सेन्सर असेल, जो फिंगरप्रिंट स्कॅन करेल. पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला फक्त सेन्सरवर बोट ठेवावे लागेल. कार्डवर मॅग्नेटिक स्ट्रिपही नसेल. नव्या कार्डसाठी एनरॉलमेंट सेंटरला (बँक किंवा संबंधित कार्यालय) जावे लागेल. तिथे कार्डधारकाचे फिंगरप्रिंट्स स्कॅन केले जातील आणि हा डाटा कार्डमध्ये ट्रान्सफर केला जाईल. त्याचबरोबर ही सर्व माहिती कार्डवर असलेल्या इएमव्ही चिपमध्ये सेव्ह केली जाईल.
आधार पेमेंटपेक्षा वेगळे तंत्रज्ञान
नव्या तंत्रज्ञानात कार्डवरच सेन्सर देण्यात आला आहे. मॉलमध्ये पेमेंट करतेवेळी कार्डवर बोट ठेवावे लागेल. ‘आधार’ तंत्रज्ञानात कार्डची आवश्यकता नाही. फक्त मॉलमध्ये आधार क्रमांक आणि बँकेचे नाव द्यावे लागेल. दुकानदार किंवा मॉलमधील कर्मचारी आपल्याकडील मशीन बँकेशी जोडेल आणि आधार क्रमांक टाकेल. बँक आपली ओळख प्रमाणित करण्यास सांगेल. जसे तुम्ही सेन्सरवर अंगठा ठेवाल आणि त्यातील डाटा जुळला तर लगेच संबंधित पेमेंट होईल. नवे कार्ड हे पारंपारिक कार्ड्सपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. पिन चोरी होणे, विसरणे असे प्रकार घडणार नाहीत