दुबईतील दाट लोकवस्तीच्या मरिना भागात असलेल्या जगातील सर्वात उंच निवासी इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
पहाट होण्यास काही अवधी असताना या ७९ मजली इमारतीच्या ५०व्या मजल्यावर आग लागली आणि अल्पावधीतच या आगीने उग्र रूप धारण केले.
शेकडो रहिवाशांची आगीतून सुखरूप सुटका करण्यात आली आणि सकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला ती आटोक्यात आणण्यात आली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या गगनचुंबी इमारतीचा वरील भाग आगीत जळून खाक झाला त्यामुळे शेजारच्या इमारतीमधील निवासी इमारतींमधूनही रहिवाशांना बाहेर काढावे लागले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.