मध्य प्रदेशातल्या उज्जैन या ठिकाणी असलेल्या महाकाल मंदिरात धुळवडीच्या दिवशी सकाळी भस्म आरतीच्या वेळी अचानाक आग लागली. या घटनेत पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. सगळ्या जखमींना किरकोळ दुखापत झाली आहे. या सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितलं की मंदिराच्या गाभाऱ्यात भस्म आरती सुरु असताना आग लागली. सगळ्या जखमींवर आत्ता उपचार सुरु आहेत.

काय घडली घटना?

मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी असलेलं महाकांलेश्वर मंदिर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक स्थान आहे. आज सकाळी भस्म आरती सुरु असताना या ठिकाणी अचानक आग लागली. या घटनेत पुजाऱ्यासह १३ भाविकांना इजा झाली आहे. आरतीच्या वेळी गुलाल उधळत असताना ही घटना घडली. आज धुळवड असल्याने मंदिरात गुलाल उधळण्यात येत होता. कुणीतरी पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. त्यावेळी त्यांच्या हातात आरती होती. गुलालातले रसायन आगीत मिसळले गेल्याने आग भडकली असावी असा अंदाज काही प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याच्या ज्या भिंती आहेत त्यांना चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. या ठिकाणी गुलाल उधळला जाऊ नये म्हणून फ्लेक्स लावण्यात आले होते. मात्र आगीमध्ये हे फ्लेक्सही जळाले. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. पुजारी संजीव आणि यांच्यासह १३ जण या घटनेत भाजले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.