Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन पर्वतावर फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, याठिकाणी ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर काही दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यात अनेक पर्यटक मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर अमित शाह, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल सिन्हा हे श्रीनगरला तातडीने रवाना झाले.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बैसरन पर्वतावर फक्त पायी किंवा घोड्यावरून जाता येते. निसर्गसौंदर्यामुळे या भागाला मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. वाहन थेट पोहोचत नसल्यामुळे सुरूवातीला बचाव कार्यात अडथळे आल्याचे सांगितले जाते.

प्रत्यक्षदर्शींचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हल्ला इतका भीषण होता की, त्यात किमान २० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

भाजपाचे नेते रवींद्र रैना यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्यामागे हात असण्याची शक्यता वर्तविली. या संपूर्ण परिसराला वेढा घातला जावा आणि दहशतवादी, तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. या घटनेत ज्यांना दुखापत झाली, त्या कुटुंबियांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. या हल्ल्यामागे फक्त येथील शांतता भंग करून विनाकारण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. अशा हल्ल्याचे कधीही समर्थन करता येणार नाही.