नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मद्य व्यवसायात सुधारणा करण्यासाठी दिल्लीच्या आप सरकारने स्वत: नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करून, आम आदमी पक्षाला अवैधरीत्या ‘मोठी रक्कम’ देणाऱ्या कंपन्यांनाच मद्य परवाने दिले. पंजाब निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून आपने हा गैरफायदा मिळवला, असा आरोप भाजपने बुधवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला, की दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक अरिवद केजरीवाल हे या मद्य धोरण घोटाळय़ामागचे खरे खलनायक सूत्रधार आहेत. मात्र, या घोटाळय़ात अडकून चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून त्यांनी या संबंधित एकाही फाइलवर स्वाक्षरी केली नाही. संबित पात्रा यांनी आरोप केला, की ‘आप’ने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने अबकारी धोरणांतर्गत मद्याची घाऊक विक्री खासगी क्षेत्राला न देता सरकारकडे ठेवण्याची शिफारस केली होती. जेणेकरून सरकारचा महसूल वाढेल. दारूची किरकोळ विक्रीही मोठय़ा कंपन्यांना न सोपवता ‘लॉटरी’ पद्धतीने व्यक्तींना देण्यात यावे, अशी शिफारसही समितीने केली होती. परंतु आप सरकारने या शिफारशींकडे दुर्लक्ष केले आणि घाऊक विक्री खासगी कंपन्यांना कुठलाही लिलाव किंवा सार्वजनिक घोषणा न करता सोपवली. पंजाब निवडणुकीसाठी ‘मोठय़ा रकमे’ची गरज असल्यानेच त्यांनी हे केले. ज्याने ‘मोठी रक्कम’ दिली त्यांना समितीच्या शिफारशींना बगल देऊन ठेका दिला गेला. काळय़ा यादीत टाकलेल्या कंपन्यांनाही परवाने बहाल केले गेले. अनेकांना किरकोळ परवाने वाटून दिल्ली सरकारने मद्य व्यावसायिकांचा लाभार्थी दबावगट तयार केला.

लाच देऊ करणाऱ्यांची नावे जाहीर करा : भाजप

भाजपने आपच्या दिल्लीतील चार आमदारांना लाच दिल्याचा आरोप ‘आप’ने केला, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता संबित पात्रा म्हणाले, की त्यांना मद्य माफियांकडून अशी लाच घेण्याचे प्रस्ताव आले असतील. भाजपकडून ज्या व्यक्तींनी हा लाचेचा प्रस्ताव दिला, त्यांची नावे ‘आप’ जाहीर का करत नाही?

सीबीआयचे राजद नेत्यांवर छापे

नवी दिल्ली, पटना : बिहारमध्ये नवे सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात असतानाच बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे घातल़े त्यात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मालकीच्या कंपनीच्या गुरुग्राममधील बांधकामाधीन मॉलचा समावेश आह़े सीबीआयकडून दिल्ली, गुरूग्राम, पटना, मधुबनी, कटिहार आदी २५ ठिकाणी छापे घातल़े  तेजस्वी यादव यांच्याबरोबरच राजद आमदार सुनील सिंह, खासदार अश्फाक करीम, फैयाज अहमद आणि माजी आमदार सुबोध राय यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे घालण्यात आल़े

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firms paid hefty commissions to aap got for liquor license bjp allegation zws
First published on: 25-08-2022 at 03:22 IST