ओमायक्रॉनने आधीच सगळ्या जगाची चिंता वाढवलेली असताना इस्त्रायलने या चिंतेत भर टाकली आहे. इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर सरकारने तात्काळ पावलं उचलत हवाई वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. याशिवाय कडक निर्बंध लावण्यासंबंधी सरकार विचार करत आहे. AP च्या वृत्तानुसार इस्त्रायलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी देशात ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.

वृत्तानुसार, दक्षिणेकडील शहर बेर्शेबा येथील सोरोका रुग्णालयात दाखल ६० वर्षीय व्यक्तीचा दोन आठवड्यांनी सोमवारी मृत्यू झाला. या रुग्णाला इतर व्याधीही होत्या असं सांगितलं जात आहे. मात्र यासंबंधी अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान यानंतर इस्त्रायलने देशातून बाहेर जाणारी आणी येणारी अशी सर्व हवाई वाहतूक रोखली आहे. तसंच इतरही कडक निर्बंध लावण्यासंबंधी विचार सुरु आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी वृद्ध नागरिक तसंच गंभीर आजारांचा सामना करत असलेल्यांसाठी चौथ्या बूस्टर डोसला मंजुरी देण्यासंबंधी आपण विचार करत असल्याचं सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या प्रमणात आपल्या देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याची सुरुवात करणाऱ्या देशांमध्ये इस्त्रायल होता. तसंच बूस्टर डोसचा प्रस्ताव ठेवणाराही पहिला देश आहे. ९० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात करोनामुळे आतापर्यंत ८ हजार २०० लोकांनी जीव गमावला आहे.