कोलकाता, पीटीआय
पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी भाजप सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या गदारोळात भाजपच्या पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले. बंगाली स्थलांतरितांवरील अत्याचारांबाबतच्या ठरावावरून हा वाद झाला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणापूर्वी भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे २ सप्टेंबरला निलंबन करण्यात आले होते. त्याबाबतही भाजप सदस्यांनी घोषणा दिल्या. याला तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी प्रत्युत्तर देत घोषणाबाजी केल्याने वातावरण चिघळले. विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना दिवसभरासाठी निलंबित केले. घोष यांनी सदनातून बाहेर जाण्यास नकार दिल्याने सुरक्षारक्षकांकरवी त्यांना बाहेर नेण्यात आले. यावरून वाद अधिक वाढला. या गोंधळातच भाजपच्या अग्निमित्रा पॉल, मिहीर गोस्वामी, बंकिम घोष तसेच अशोक दिंडा या आमदारांना निलंबित करण्यात आले.
दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी सुरू असल्याने सुरक्षारक्षक परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून खबरदारी घेत होते. भाजप मला का बोलू देत नाही? असा प्रश्न ममतांनी विचारला. अनेक वेळा तृणमूलचे सदस्य भाजप सदस्यांवर धावून गेले तेव्हा सुरक्षारक्षकांनी रोखले. या गोंधळात विधानसभा अध्यक्षांनी कामकाज सुरूच ठेवले. त्यानंतर आवाजी मतदानाने ठराव संमत करण्यात आले. त्यापूर्वी भाजप सदस्यांनी सभात्याग केला.
ठरावाची गरज काय?
काही राज्यांमध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांवरील कथित अत्याचाराबाबतच्या ठरावाची गरज काय? असा सवाल भाजपच्या अंगमित्रा पॉल यांनी विचारला. सत्तारूढ पक्ष याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बाहेरील देशातून येणाऱ्या बंगाली हिंदूंनी चिंता करण्याची गरज नाही. केंद्राने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याचे त्यांनी नमूद केले. या कायद्याला तृणमूल काँग्रेसचा विरोध असल्याचा दावा पॉल यांनी केला.