पीटीआय, नवी दिल्ली
उत्तर भारतील अनेक राज्यांमध्ये सोमवारीही मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडून जीवितहानी झाली. तर पंजाबमध्ये पुरामुळे महिन्याभरात मरण पावलेल्यांची संख्या २९ इतकी झाली असून अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांना मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. जम्मू-काश्मीरमच्या किश्तवार जिल्ह्यात वारवान खोऱ्यात २६ ऑगस्टला झालेल्या ढगफुटीमध्ये जवळपास १९० घरांचे नुकसान झाले, तसेच ४५ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हिमाचल प्रदेशच्या सिमल्यामध्ये झालेल्या भूस्खलनांच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३५ वर्षीय विरेंदर कुमार आणि त्यांच्या १० वर्षीय मुलीचा समावेश आहे. सिमला शहराबाहेर जुंगा भागात त्यांच्या घरावर भूस्खलनाचा ढिगारा कोसळला. त्यावेळी विरेंदर यांची पत्नी घराबाहेर असल्यामुळे बचावली. दुसऱ्या घटनेत सिमल्याजवळील चोल गावात एक घर कोसळून त्यातील कलावती नावाची वृद्ध महिला मरण पावली.
उत्तराखंडमध्ये केदरानाथ राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमाराला भूस्खलन होऊन दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आणि काहीजण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोनप्रयाग आणि गौरीकुंडदरम्यान मुनकटियाजवळ डोंगरावरून खडक आणि दगडांचा ढिगारा खाली आला आणि एका वाहनावर कोसळला. वाहनातील दोघे जागेवरच ठार झाले, इतर सहा जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती रुद्रप्रयागचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवर यांनी दिली.
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी साचले आहे. पंजाब, हरियाणा आणि चंडीगडमध्ये सोमवारीही मुसळधार पाऊस झाला. पंजाबमधील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे आणि तंत्रनिकेतन संस्था बुधवारपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून २.५६ लाखांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत
- ऑगस्ट महिन्यात पंजाबमध्ये २५३.७ मिमी पाऊस, सरासरीपेक्षा ७४ टक्के जास्त, राज्यात गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक पर्जन्यमान
- हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या घटनांमुळे सिमला-काल्का मार्गावरील सहा रेल्वेगाड्या रद्द, राज्यभरात ७९३ रस्ते बंद
- उत्तराखंडमधील चारधाम यात्रा, हेमकुंड यात्रा स्थगित
- रुद्रप्रयागमधील अलकनंदा आणि मंदाकिनी नद्या धोक्याच्या पातळीवर
- हरिद्वार, ऋषिकेश येथे गंगा नदीच्या तर दिल्लीत यमुनेच्या पातळीत वाढ
- हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये सतलज, बियास आणि रावी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पूर
- छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामध्ये पुरामुळे ९६ गुरांचा मृत्यू, ४९५ घरांचे नुकसान
- किश्तवारमध्ये २६ ऑगस्टला झालेल्या ढगफुटीत सुमारे १९० घरांचे नुकसान, ४५ गुरांचा मृत्यू
शहा यांच्याकडून पाहणी
जम्मू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी पूरग्रस्त जम्मूचा दौरा केला आणि पीडितांचे मदत व पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. शहा यांच्याबरोबर नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा हे होते. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहा यांनी झालेल्या नुकसानाची माहिती दिली.