पीटीआय, पूँछ (जम्मू-काश्मीर) : मुसळधार पाऊस आणि दृष्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत अतिरेक्यांनी वाहनावर केलेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. यात एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर राजौरीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लष्कराच्या नॉर्दन कमांड मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास राजौरी विभागात भिंबर गली ते पूँछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला. यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने दृष्यमानता कमी होती. अतिरेक्यांनी टाकलेल्या ग्रेनेडमुळे वाहनाने पेट घेतला. यामध्ये दहशतवादविरोधी कारवाईसाठी पाठविण्यात आलेले राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान शहीद झाले. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरूवातीला वाहनावर वीज पडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती जम्मूमधील लष्कराच्या प्रवक्त्याने दिली होती. मात्र कालांतराने ही अतिरेकी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. साडेसहाच्या सुमारास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरवरून या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. मात्र ६.४५च्या सुमारास ही नैसर्गिक आपत्ती नसून अतिरेकी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच लष्कराने निवेदन जारी करून घटनेची माहिती दिली.