कुटुंबातील एखादी व्यक्ती काही कारणास्तव तुरुंगात गेली असेल तर कुटुंबियांना दुःख होणे स्वाभाविक आहे. मात्र तेलंगणातील पाच कुटुंबियांचे दुःख यापेक्षा वेगळे होते. त्यांच्या घरातील कर्ते पुरुष १८ वर्ष दुबईच्या तुरुंगात कारावास भोगत होते. तब्बल १८ वर्षांनंतर हे लोक दुबईच्या तुरुंगातून पुन्हा एकदा मायदेशी परतले आहेत. यावेळी विमानतळावर त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भारत राष्ट्र समितीचे नेते केटी रामा राव यांनी या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शिवरथ्री मल्लेश, शिवरथ्री रवी, गोल्लम नामपल्ली, दुंडुगुला लक्ष्मण आणि शिवरथ्री हनमंथू हे सर्व तेलंगणामधील सिरसिला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे पाचही जण दुबई येथे नोकरी करत होते. त्यांच्यावर एका नेपाळी नागरिकाचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांना २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या पाच नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी बीआरएसचे नेते केटीआर प्रयत्नशील होते. आता पाचही जणांची सुटका झाल्यानंतर त्याचे श्रेय केटीआर यांना देण्याचा प्रयत्न होत आहे. २०११ साली केटीआर यांनी नेपाळला भेट देऊन पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना १५ लाखांची आर्थिक मदत देऊ केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषेच्या अडचणीमुळे पाचही व्यक्तींच्या कायदेशीर मदतीतीची गुंतागुंत वाढली होती. त्यामुळे अपील करूनही न्यायालयाने त्यांना कठोर शिक्षा दिली होती. तसेच प्रारंभिक दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या तुरुंगवासात आणखी वाढ झाली.

दुबईत कायद्यात बदल झाल्यामुळे पाचही जणांच्या सुटकेची संधी मिळाली. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मंत्री केटीआर यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मदतीने दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याकडे पुन्हा एकदा दयेचा अर्ज केला. अखेर दुबईच्या न्यायालयाने प्रदीर्घ वाटाघाटानंतर या पाचही भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली.