पीटीआय, गंगटोक, जलपैगुडी

सिक्कीमच्या तीस्ता खोऱ्यात आकस्मिक पुराने थैमान घातल्याच्या तिसऱ्या दिवशी, नदीतून आणि तिच्या प्रवाहाच्या खालच्या भागातील चिखलाच्या बंधाऱ्यातून बाहेर काढलेल्या मृतदेहांची संख्या २२ झाली आहे. यामध्ये लष्कराच्या सात जवानांचा समावेश आहे.बारदांग भागातून बेपत्ता झालेल्या २३ लष्करी जवानांपैकी सात जणांचे मृतदेह खालच्या भागातील वेगवेगळय़ा ठिकाणी सापडले आहेत. एका जवानाची यापूर्वी जिवंत सुटका करण्यात आली असून उर्वरित जवानांचा शोध तीस्ता नदी जेथून वाहते त्या सिक्कीम आणि उत्तर बंगाल अशा दोन्ही भागांत घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी शुक्रवारी सांगितले.

मृत्युमुखी पडलेल्या सात जवानांपैकी चौघांची ओळख पटली आहे. मृतदेह तीस्ता नदीच्या, तसेच जलपैगुडी व कूचबिहार जिल्हे आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी भाग येथील तीस्ताच्या उपनद्यांच्या खोऱ्यातून बाहेर काढण्यात आले.२२ मृतांपैकी १५ पुरुष व सहा महिला असून, एक मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्यामुळे त्याचे लिंग कळू शकले नाही.उत्तर सिक्कीममधील लोन्हाक सरोवरावर बुधवारी पहाटे ढगफुटी झाल्यानंतर आलेल्या आकस्मक पुरामुळे १५ लष्करी जवानांसह एकूण १०३ लोक बेपत्ता आहेत.

हेही वाचा >>>लँडर, रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता मावळली; ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांचे मत

केंद्राकडून मदत

सिक्कीममधील पूरग्रस्त लोकांना मदत पुरवण्यासाठी राज्य आपदा प्रतिसाद निधीतील (एसडीआरएफ) केंद्राच्या वाटय़ातून अग्रिम रक्कम म्हणून ४४.८ कोटी रुपये जारी करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंजुरी दिली आहे.

 शहा यांच्या निर्देशावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतर-मंत्री केंद्रीय पथक स्थापन केले असून, हिमनदी तलाव उद्रेक पुरामुळे (ग्लेशियल लेक आऊटबस्र्ट फ्लड), ढगफुटी आणि आकस्मिक पूर यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी हे पथक सिक्कीमच्या प्रभावित भागांना भेट देणार असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.