भंडारा मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांचे आव्हान असून या मतदारसंघात १० टक्के फ्लोटिंग व्होटर (कुंपणावरचे मतदार) आहेत आणि यावरच भाजपाची मदार आहे. ग्रामीण भागात सरकारी योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी घरोघरी कार्यकर्त्यांची फौज जाणार असून मोदींच्या सभेनंतर हे मतदार भाजपाकडेच वळतील, असा दावा भाजपा नेते करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया- भंडारा या लोकसभा मतदारसंघात अर्जुनी मोरगाव, देवरी-आमगाव, तिरोडा-गोरेगाव, भंडारा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील गोंदिया वगळता सर्व जागा भाजपाकडे आहेत. तर गोंदियात काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार आहेत. २०१४ मध्ये नाना पटोले या मतदारसंघातून निवडून आले होते. सध्या नाना पटोले हे काँग्रेसमध्ये आहेत. या मतदारसंघात कुणबी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा या तिन्ही पक्षांनी कुणबी उमेदवारांना संधी दिली आहे.

या मतदारसंघात सुमारे अठरा लाख मतदार आहेत. यातील सुमारे १० ते १२ टक्के कुंपणावरचे मतदार आहेत. म्हणजेच हे मतदार परिस्थितीनुसार त्यांचे मत देतात. ते कोणत्याही पक्षाची ठराविक व्होट बँक नाही. हीच बाब हेरून भाजपाचे काम सुरु आहे. सर्जिकल स्ट्राइक, देशाची सुरक्षा हे मुद्दे सुशिक्षित मतदारांना महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे ते मोदींच्या खंबीर नेतृत्वाला पाठिंबा देतील, असे एका भाजपा नेत्याने सांगितले. तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून मोदी सरकारच्या योजनांमुळे त्यांचा कसा फायदा झाला, हे त्यांना पटवून सांगू, असेही या नेत्याने सांगितले. या कुंपणावरच्या मतांबाबत विचारले असता भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले म्हणतात, या भागात भाजपा आमदारांचे काम चांगले आहे. देशात मोदी सरकारनेही अनेक कल्याणकारी योजना राबवल्याने आमचा विजय निश्चित आहे. प्रत्येक मतदारसंघात कुंपणावरची मतं असतात. ती या भागातही आहेत आणि मोदी सरकारचे काम पाहता ही मतं आम्हालाच मिळतील, असा विश्वासही त्यांनी केला आहे.

या भागात भाजपाचे राजेंद्र पटले यांनी बंडखोरी केली असून ते पोवार समाजातून येतात. या समाजाची मतदारसंघात लक्षणीय मते आहेत. यामुळे भाजपाचे नुकसान होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचेही या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. कुंपणावरची मतं लक्षणीय असून मोदी सरकारचे अपयश या मतदारांपर्यंत पोहोचवत असल्याचे आघाडीचे नेते सांगतात.

दरम्यान, भाजपाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोदींच्या सभेचे नियोजनात व्यस्त होते. ते मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आता प्रचाराला मोजके दिवस असल्याने ते किती मतदारांपर्यंत पोहोचतील, असा सवालही काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने उपस्थित केला. भाजपा नेते मोदींच्या सभेवर अवलंबून होते, पण आम्ही घरोघरी जाऊन, पदयात्रा काढून प्रचार केला, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आघाडीचे नेते व्यक्त करीत आहेत. आता ही कुंपणावरची मतं नेमकी कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Floating vote to save bjp in gondiya
First published on: 06-04-2019 at 09:08 IST