देशातील बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणी रांचीतील सीबीआयचे विशेष न्यायालय आज (शनिवारी) निर्णय देणार आहे. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव हे रांचीत पोहोचले असून देशातील न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, मला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्यायालयाचा निर्णय कोणाच्याही बाजूने आला तरी माझ्या समर्थकांनी कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल असे कृत्य करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे अडचणीत आले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी पाच खटले असून यातील एका खटल्यात २०१३ मध्ये न्यायालयाने निकाल दिला होता. या खटल्यात लालूंना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

रांचीतील न्यायालय आज (शनिवारी) देवघर कोषागारातील भ्रष्टाचाराबाबत निर्णय देणार आहे. या खटल्यात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण २२ आरोपी आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव हे शनिवारी सकाळी रांचीत पोहोचले. रांचीत न्यायालयाबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून मला न्याय मिळेल’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या घोटाळ्यात भाजपनेच आपल्याला फसवल्याचा गंभीर आरोप त्यांनी शनिवारी केला होता. या निकालाचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले होते.

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. 2 जी घोटाळा व आदर्श घोटाळ्यात भाजपचे बिंग फुटले, चारा घोटाळ्यातही भाजपने खोटे आरोप केल्याचे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाने घरात पूजाअर्चना केली. लालूप्रसाद यादव यांच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली आहे. दुपारी तीन वाजल्यानंतर न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. यापूर्वी चारा घोटाळ्यातील खटल्यात दोषी ठरल्याने लालूप्रसाद यादव यांना खासदारकीला मुकावे लागले होते. बनावट देयके, कागदपत्रे तयार करुन राजकारणी, सनदी अधिकारी आणि व्यावसायिक यांनी संगनमताने जनतेचा पैसा हडपला, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता.

More Stories onस्कॅमScam
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fodder scam verdict cbi court in ranchi have faith that i will get justice says rjd chief laluprasad yadav
First published on: 23-12-2017 at 12:50 IST