मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील २० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, सरकारकडून त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या आंदोलनाबाबत भाजपा नेत्यांकडून विविध वादग्रस्त विधानं देखील करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

“मोदी सरकारसाठी विरोध दर्शवणारे विद्यार्थी हे देशद्रोही, चिंतीत असणारे नागरीक शहरी नक्षलवादी, प्रवासी कामगार करोना वाहक, बलात्कार पीडित म्हणजे कुणीही नाही, आंदोलकर्ते शेतकरी हे तर खलिस्तानी आणि  भांडवलादर म्हणजे सर्वात चांगले मित्र आहेत.” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचे मंत्री तसेच नेते मंडळींकडून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या आंदोलनात खलिस्तानी, चीन व पाकिस्तानचा हात असल्याची वक्तव्य भाजपा नेत्यांकडून केली गेली आहेत. तर, नुकतच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील शेतकरी आंदोलनाबाबत एक खळबळजनक विधान केलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.

“आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल?”

दरम्यान, या अगोदर राहुल गांधी यांनी या शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकावर टीका करत, “कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावे लागेल?” असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला होता.