US Report आम्ही लोकशाही मानतो आणि इस्लामचं रक्षण करतो अशी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्याचं दिसून येतं. मात्र जगातल्या सगळ्यात भयंकर देशांपैकी हा एक देश आहे. खासकरुन जे धर्माने अल्पसंख्य आहेत अशांसाठी तर हा देश प्रचंड धोकादायक आहे. हिंदू, ख्रिश्चन, शीख यांच्यासाठी पाकिस्तान म्हणजे नरकच जणू. हे आम्ही नाही तर अमेरिकेतला एक अहवाल सांगतो आहे.
कुणी केला आहे हा अहवाल?
The US State Department 2023 Internation Religious Freedom Report मध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. जे अल्पसंख्य आहेत त्यांच्यावर अत्याचार केले जातात, त्यांना भेदभावाने वागवलं जातं हे या अहवालात नमूद केलं गेलं आहे. पाकिस्तान कायमच त्यांची प्रतिमा जागतिक स्तरावर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र या अहवालाने त्यांचा बुरखा टराटरा फाडला आहे.
काय म्हटलं आहे अहवालात?
हिंदू आणि ख्रिश्चन मुलींच्या १३६ नोंद झालेल्या खटल्यांचा अभ्यास केल्यानंतर या अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की या प्रकरणांमध्ये अनेक मुलींचं सक्तीने धर्मांतर करण्यात आलं. यातल्या बहुतांश मुली या अल्पवयीन आहेत. त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं. धर्मांतरांनंतर अनोळखी लोकांशी त्यांचे निकाह लावण्यात आले. १४ मुलींना तर बळजबरीने कोर्टासमोर त्यांची या सगळ्याला संमती आहे हे कबूल करण्यासाठी भाग पाडण्यात आलं.
बलात्कार, धर्मांतर नित्याचेच प्रकार
पाकिस्तानतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना पळवून नेलं जातं आणि त्यांच्यावर बलात्कार केले जातात. २०२३ च्या लोकसंख्येनुसार पाकिस्तानत हिंदूंसह अल्पसंख्य जनतेचं प्रमाण अवघं पाच टक्के किंवा त्याहून कमी आहे. त्यात ख्रिश्चन, शीख, पारशी यांचाही समावेश आहे. हिंदू दलितांना या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची, झाडू मारण्याचीच कामं दिली जातात. जातीनुसार भेदभावही या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आहे असंही अमेरिकेचा अहवाल सांगतो. पाकिस्तानातील हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले केले जातात. बऱ्याचदा त्यांच्यावर अतिक्रमण केलं जातं. बऱ्याच प्रकरणांमध्ये मंदिरांची जमीन जप्त केली जाते. त्याला कुठलाही कायदेशीर आधार नसतो. हिंदू नेत्यांचं म्हणणं आहे की हिंदूंची पाकिस्तानातली लोकसंख्या प्रचंड रोडावली आहे. याचाही उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. विधानसभेची निवडणूक असेल तर अल्पसंख्याक जागेवरुन महिलांना लढू देण्यास विरोध दर्शवला जातो. या ठिकाणी जे अहमदी लोक आहेत ते स्वतःला मुस्लिम म्हणवून घेऊ शकत नाहीत त्यांनी तसं केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. पाकिस्तानच्या घटनेत तशी तरतूद आहे असंही अमेरिकेचा अहवाल सांगतो.