परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे राजकीय नसून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर केंद्रात मंत्रीपदी नियुक्त झाले. जवळपास ४८ वर्षांपूर्वी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या आठवणींना त्यांनी स्वत: उजाळा दिला आहे. नुकताच त्यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात नव्याने UPSC उत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांशी संवाद साधला. आणीबाणी हटवली गेली त्याच दिवशी, म्हणजेच २१ मार्च १९७७ रोजी आपली UPSC साठीची मुलाखत झाली होती, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
“माझ्या मुलाखतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच २० मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. आणीबाणी पराभूत झाल्याची जनभावना सर्वत्र व्यक्त होत होती. एकप्रकारे यातूनच मी UPSC च्या मुलाखतीपर्यंत पोहोचू शकलो”, असं जयशंकर यांनी या कार्यक्रमात सांगितलं. “आणीबाणी हटवली त्याच दिवशी माझी मुलाखत होती. त्यामुळे आणीबाणीमुक्त भारतात शाहजहान रोडवरील कार्यालयात मुलाखतीसाठी जाणारा मी पहिला व्यक्ती होतो”, अशी आठवण त्यांनी सांगितली.
जयशंकर यांना कोणता प्रश्न विचारला गेला?
दरम्यान, दिल्लीतील या कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर यांनी ४८ वर्षांपूर्वी झालेल्या त्यांच्या मुलाखतीत समोरच्या व्यक्तीने त्यांना कोणता प्रश्न विचारला होता, याचीही आठवण सांगितली. “१९७७ च्या निवडणूक निकालांत काय घडलं, हे मला विचारण्यात आलं होतं. जेएनयूमध्ये शिक्षण आणि राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास केल्यामुळे मी नशीबवान होतो. तेव्हा मी आणीबाणीविरोधातल्या चळवळींमध्ये काम केलं होतं. १९७७ च्या निवडणूक प्रचारातही आम्ही सहभागी झालो होतो. आम्ही सगळ्यांनी आणीबाणीला पराभूत करण्यासाठी काम केलं”, असं ते म्हणाले.
मुलाखत घेणारी मंडळी त्या वेळच्या निवडणूक निकालांमुळे प्रचंड धक्क्यात होती, असं जयशंकर यांनी सांगितलं. “त्यांना निकालांमुळे धक्का बसला होता. निकाल असे काही लागलेत यावर त्यांचा विश्वासच बत नव्हता. पण आम्हा सामान्य विद्यार्थ्यांना मात्र त्याचं फारसं आश्चर्य नव्हतं. जनतेमध्ये आणीबाणीविरोधात वातावरण सहज दिसून येत होतं”, असं जयशंकर म्हणाले.