गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून ते कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. सोमवारी तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता पटेल यांनी म्हटलं की “मी सोमवारी भाजपात प्रवेश करणार नाही, असं काही असेल तर तुम्हाला कळवू.”

त्यामुळे सोमवारी हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पण भविष्यात ते भाजपात प्रवेश करण्याचा विचार करू शकतात, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समजाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र अंतर्गत कलहामुळे त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण हार्दिक पटेल यांनी तूर्तास सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, हार्दिक पटेल यांनी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसावाले यांच्या हत्येवरून पंजाबमधील भगवंत मान सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “कोणतंही सरकार अराजक हातात जाणं किती घातक असू शकतं, याचा प्रत्यय नुकतंच पंजाबमध्ये घडलेल्या घटनेनं आला. पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता एक प्रसिद्ध तरुण गायक सिद्धू मूसावाले यांची हत्या झाली. यामुळे आज अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत.”