दिल्ली विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक डॉ. रितू सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या बाहेरील जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी भजी विकण्याचा गाडा टाकल्याबद्दल सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, अनधिकृत गाडीमुळे रहदारीसाठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आम्ही पथक पाठवून त्याठिकाणाहून स्टॉल हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम २८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. रितू सिंह यांची नोकरी गेल्यानंतर त्यांनी भजी तळण्याचा आणि त्यातून निषेध व्यक्त करण्याचा मार्ग निवडला होता.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, दिल्ली विद्यापीठातील २८ वर्षीय महिला प्राध्यापक दलित समाजातून येतात. जातीय छळ आणि बेकायदेशीरपणे त्यांची विद्यापीठातून हकालपट्टी झाल्याबद्दल त्या १९२ दिवसांपासून विद्यापीठाबाहेर आंदोलन करत होत्या. त्यानंतर विद्यापीठाबाहेरच त्यांनी भजी विकण्याचा स्टॉल टाकला. डॉ. सिंह यांची २०१९ साली दौलताराम महाविद्यालयात नियुक्ती झाली होती. पण वर्षभरातच त्यांची हकालपट्टी करण्यात आली, तसेच त्यांच्या कंत्राटाचेही नुतनीकरण करण्यात आले नाही.

डॉ. सिंह यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, माझ्याकडे नोकरी नाही. ज्या विद्यापीठाने मला पदवी दिली, त्या विद्यापीठाबाहेर मी रस्त्यावर भजी तळण्याचे काम सुरू केले आहे. यातूनच माझी गुजराण होते. माझी चुकीच्या पद्धतीने गच्छंती केल्यानंतर माझ्यावर हे काम करण्याची वेळ आली आहे.

माझे आंदोलन दाबण्याचा अनेकदा प्रयत्न झाला होता. मी सुरू केलेले ‘पीएचडी पकोडेवाली’ ही हातगाडी याच आंदोलनाचा एक भाग आहे. मी रविवारी विद्यापीठाच्या गेट क्र. ४ च्या बाहेर कुणालाही अडचण होणार नाही, अशापद्धतीने हातगाडी सुरू केली. दोन दिवसांनी पोलिसांनी माझ्या गाड्यावर येऊन परवान्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणावरून गाडा हटविण्याची धमकी दिली. मला सन्मानपूर्वक नोटीस बजावता आली असती, पण यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज होती का? असाही प्रश्न डॉ. सिंह यांनी व्यक्त केली.

पोलिसांच्या कारवाईनंतर डॉ. सिंह म्हणाल्या की, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त त्या पुन्हा एकदा विद्यापीठाच्या बाहेर जाऊन भजीचा स्टॉल टाकणार आहेत. ऑगस्ट २०२० साली डॉ. सिंह यांना नियुक्तीपत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्या दिल्ली उच्च न्यायालयात गेल्या होत्या.