भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मंगळवारी रात्री सुषमा स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागला होता. यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे. दरम्यान, स्वराज यांनी निधनाच्या काही मिनिटं आधीच इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीसमध्ये कुलभूषण जाधव यांचा खटला लढणाऱ्या ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचं ते बोलणं अखेरचं ठरेल याची कल्पनाही नसलेले साळवे ही आठवण सांगताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
सुषमा स्वराज यांनी हरीश साळवे यांना फोन करून उद्या (बुधवारी) त्यांची खटल्याची फी घेऊन जाण्यास सांगितले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्या संभाषणाबद्दल सांगितलं. कुलभूषण जाधव खटल्यात हरीश साळवे यांनी केवळ १ रूपया फी घेऊन तो खटला लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्वराज यांनी साळवे यांना त्यांची फी देण्यासाठी संपर्क केला होता.
मंगळवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुषमा स्वराज आणि आपलं बोलणं झाल्याचं साळवे यांनी सांगितलं. “आज ८ वाजून ५० मिनिटांनी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झालो,” असे सांगताना ते भावूक झाल्याचे पहायला मिळाले. “उद्या संध्याकाळी ६ वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला या, असंही त्यांनी सांगितलं होतं. सध्या काय बोलावं हे सुचत नाही. त्या एक ज्येष्ठ मंत्री होत्या. त्यांच्या निधनाने मी माझी मोठी बहिण गमावली,” असं असं साळवे बोलताना म्हणाले