२५ लाख रुपये व आलिशान गाडीची मागणी भोवली
हुंडय़ापोटी सुनेकडे २५ लाख रुपये व आलिशान गाडी व अन्य भरमसाट मागण्या करणारे ओडिशाचे माजी मंत्री रघुनाथ मोहंती यांना हा लोभ चांगलाच महागात पडला आहे. सुनेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोन आठवडे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मोहंती यांना शनिवारी अखेर सपत्निक अटक करण्यात आली. न्यायालयाने या दोघांना दोन एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
ओडिशाचे कायदामंत्री असणाऱ्या मोहंती यांच्याविरोधात बरसा चौधुरी या त्यांच्या सुनेने बालासोर पोलीस ठाण्यात १४ मार्च या दिवशी तक्रार दाखल केली होती. मोहंती पती-पत्नी, नवरा राजाश्री तसेच नणंद व तिचा नवरा हुंडय़ासाठी आपला शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. आपल्या नवऱ्याचे विवाहबाह्य़ संबंध असल्याचा आरोपही तिने केला होता. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध ४९८ (अ) तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहंती यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, पोलिसांना शरण जाण्याऐवजी ते सपत्निक पसार झाले. त्यांचा दूरध्वनी टॅप केल्याने पोलिसांना त्यांचा ठावठिकाणी समजला व शनिवारी कोलकाता येथील एका फ्लॅटमधून त्यांना अटक करण्यात आली. गेले पंधरा दिवस ते येथे भाडय़ाच्या दोन सदनिकांमध्ये राहत होते. त्यांच्या मुलाला यापूर्वीच कटक येथून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणावरून ओडिशा विधानसभेतही भरपूर गदारोळ माजला. हा मोहंती यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, अशी भूमिका सत्ताधारी बिजू जनता दलाने घेतली होती. मात्र, यातील गांभीर्य वाढत गेल्यानंतर फरार मोहंती यांना कायद्याचा मान राखण्याचे आवाहन सरकारने केले होते. विरोधी पक्षाच्या दबावामुळेच मोहंती यांची अटक शक्य झाली, असा दावा भाजपने केला.
आता कायदा त्याचे काम करेल, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, सरकार या प्रकरणी ढवळाढवळ करणार नाही, अशी प्रतिक्रिया ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी व्यक्त केली.