संतोष प्रधान

सौंदरराजन यांना वातानुकूलित खोलीतून बाहेर येत मतांसाठी वणवण भटकावे लागणार आहे. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत लागलेला पराभवाचा डाग पुसण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. प्रशस्त राजभवन, त्यातील हिरवळीवरील आनंद काही वेगळाच. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून प्रशासकीय यंत्रणेवर वचक. त्यातच विरोधी पक्षांची सत्ता असलेले राज्य म्हणून दिल्ली दरबारी मिळणारे महत्त्व वेगळेच. या साऱ्या सुखाचा त्याग करून उन्हातान्हात प्रचार करण्याची वेळ तेलंगणाच्या माजी राज्यपाल आणि पुडुचेरीच्या  नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या डॉ. तमिळसाई सौंदरराजन यांच्यावर आली आहे. त्यातच आतापर्यंत लढलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पाचही निवडणुकांमध्ये अपयशच पदरी आल्याने या निवडणुकीत विजय मिळविण्याचे आव्हान वेगळेच.

हेही वाचा >>> Elections 2024 : “मोदींना घरी पाठविणार, मगच झोप घेणार” – उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर

भाजपने उमेदवारी दिलेला मतदारसंघही द्रमुकचा बालेकिल्ला. यामुळे तेथे निभाव लागण्याचे मोठे आव्हान. या साऱ्या आव्हानांवर सौंदरराजन यांना मात करावी लागणार आहे.  तमिळनाडूत भाजपचा पाया मुळातच कच्चा. द्रविडी राजकारणावर भर असणाऱ्या तमिळनाडूत भाजपचा हिंदूत्वाचा मुद्दा मतदारांना अजून तरी भावला नाही. अशा या तमिळनाडूत भाजपचा पाया विस्तारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही ठरावीक नेत्यांमध्ये सौंदरराजन यांचा समावेश होता. वडील काँग्रेसचे खासदार पण सौंदरराजन यांचा सुरुवातीपासूनच ओढा भाजपकडे होता. वैद्यकीय शिक्षण घेताना मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत त्या निवडून आल्या होत्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर सचिवपदही त्यांना भूषविण्याची संधी मिळाली. २०१४ ते १९ अशी पाच वर्षे त्या तमिळनाडू भाजपच्या अध्यक्षा होत्या. पण त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपची फार काही प्रगती झाली नव्हती. यातूनच २०१९ मध्ये त्यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि तमिळनाडूत भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे झाले. भाजपने विविध प्रयोग केले आहेत. अण्णा द्रमुकशी युती होणार नाही हे स्पष्ट झाल्याव भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाने काही ठरावीक जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. मग पक्षाच्या आदेशानुसार सौंदरराजन यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला. दक्षिण चेन्नई मतदारसंघातून भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली. चेन्नई शहर हा द्रमुकचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात द्रमुकशी त्यांचा सामना आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कानीमोळी यांच्या विरोधात सौंदरराजन लढल्या होत्या, पण त्यांचा निभाव लागू शकला नाही.