लोकसत्ता टीम

बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दस्तुरखुद्द भाजप लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. यामुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांना उद्या, रविवारी नागपुरात पाचारण केले आहे.

आणखी वाचा-‘‘जाती-धर्मापेक्षा विकासाला प्राधान्य द्या,” नितीन गडकरी यांचे मतदारांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज संध्याकाळी जिल्हाध्यक्ष गणेश मांटे व आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या भेटीनंतर प्रदेश भाजपकडून हे फर्मान देण्यात आले. शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपाचे बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. शुक्रवारी झालेल्या छानणीत त्यांचा अर्ज बाद झाला, पण अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आणि बंडखोरी कायम आहे. यामुळे वरील दोन नेत्यांनी आज संध्याकाळी बुलढाण्यातील विष्णुवाडीस्थित शिंदेंचे निवासस्थान गाठले. या तिघांमध्ये चाललेली दीर्घचर्चा रात्री ८ वाजता आटोपली. यादरम्यान बावनकुळे यांनी शिंदे व महाले यांच्यासमवेत चर्चा केली. मात्र, तोडगा न निघाल्याने शिंदे, महाले, मांटे, दीपक वारे यांना थेट नागपुरात पाचारण करण्यात आले. रविवारी दुपारी बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही निर्णायक बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.