अनुप्रिया पटेल (माजी केंद्रीय मंत्री)
देशाच्या आर्थिक, सामाजिक क्षेत्रात बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक विकासाचा विविधांगी विचार करण्याचे त्यांच्या भाषणातून जाणवले. शेती क्षेत्रातील तसेच, उद्योगवाढीसाठी खासगी गुंतवणुकीला दिलेले प्रोत्साहन, ग्रामीण विकास आणि शहरी विकासाच्या वेगळ्या गरजा लक्षात घेऊन केलेली तरतूद, मुख्यत पायाभूत विकासासाठी पुढील पाच वर्षांत होणाऱ्या गुंतवणुकीसाठी तयार केला जाणारा पथ आराखडा या सगळ्याची साकल्याने मांडणी अर्थसंकल्पात केलेली आहे.
ग्रामीण भागांमध्ये पाण्याची टंचाई ही मोठी समस्या आहे. देशातील बहुतांश जिल्हे, त्यातील तालुके आणि ब्लॉक स्तरावर ही समस्या पाहायला मिळते. पाणीटंचाई ही महिलांसाठी अत्यंत कष्टदायी असते. त्यांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी करावी लागणारी पायपीट सगळ्यांनीच पाहिलेली आहे. प्रत्येक घरात पिण्याचे पाणी या घोषणेचा पुनरुच्चार अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. आता जलशक्ती मंत्रालय हे नवे मंत्रालय निर्माण झाले असल्याने पाण्याच्या प्रश्नाकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही सर्वात अर्थसंकल्पातील मोठी बाब असेल.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरचा विस्तार झाला. पुढील वर्षांत आणखी एक ट्रिलियन डॉलरची वाढ होण्याचा विश्वास अर्थसंकल्पात व्यक्त केलेला आहे. हा विश्वास वास्तवात उतरू शकेल असे धोरण केंद्र सरकार राबवत आहे. असे असेल तर पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यस्था होण्यात कोणतीही अडचण येईल असे वाटत नाही. अर्थसंकल्पात पायाभूत विकासावर भर दिलेला आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मितीही होऊ शकेल. गेल्या पाच वर्षांमध्ये पायाभूत सुविधांचा विस्तार झालेला आहे. पण, या अर्थसंकल्पात विशेषत्वाने पायाभूत विकासाचा उल्लेख सीतारामन यांनी केलेला आहे.
महिलांच्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प विशेष म्हणता येईल. ‘नारी तू नारायणी’ हे घोषवाक्य सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातून दिलेले आहे. महिलाविषयक धोरणात आता बदल झालेला आहे. निव्वळ महिला केंद्रित धोरणे राबवली जाणार नाहीत तर, महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाची धोरणे आखली जातील. त्यातून महिलांचे नेतृत्व विकसित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. आगामी काळात त्याचे अधिकाधिक प्रत्यंतर दिसेलच. केंद्र सरकारकडून महिलांच्या सबलीकरणासाठी जास्तीत जास्त योजना वास्तवात आणल्या जातील.
निर्मला सीतारामन यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री बनण्याचा बहुमान मिळाला ही मोठी ध्येयपूर्ती म्हणावी लागेल. सीतारामन यांनी अर्थसंकल्प खूप छान मांडला. त्या अधूनमधून हिंदीत बोलत होत्या. काही ‘वनलाइनर’ त्यांनी हिंदीतून दिले. काही मोठी वाक्येही त्यांनी हिंदीतून म्हटली. सृजनात्मक वगैरे कठीण हिंदी शब्द होते. शुद्ध हिंदीतील शब्द उच्चरणे अवघड असते. तेही त्यांनी नीट उच्चारले. त्याबद्दल सीतरामन यांचे कौतुक केले पाहिजे. ही वाक्ये पूर्ण झाल्यावर सदस्यांकडून त्यांना मिळालेला प्रतिसाद खूप काही सांगून गेला.
स्वत सीतारामन यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भावदेखील पाहण्याजोगे होते. दोन तास त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये, अचूकतेने अर्थसंकल्प सादर केला. महत्त्वाचे मुद्दे पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगितले. सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण वैशिष्टय़पूर्ण होते. एका महिलेने अर्थसंकल्प सादर केला याचा मला अभिमान वाटतो. पुढील पाच वर्षे सीतारामन अर्थमंत्री म्हणून अत्यंत उत्तम कामगिरी करतील यात कोणतेही दुमत असू नये!
हा अर्थसंकल्प निव्वळ महिलांच्या सबलीकरणासाठीच नव्हे तर सर्वागीण विकासाचा मार्ग दाखवणारा आहे.
