वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कॅपिटॉलबाहेर झालेल्या दंगलीची चौकशी करणाऱ्या ‘हाऊस जानेवारी ६ कमिटी’ने त्यांना स्वत: हजर राहून जबाब देण्यासाठी समन्स पाठवले आहे. या दंगलीशी संबंधित काही धक्कादायक चित्रफिती समोर आल्या असून या कटाबाबत ट्रम्प यांना खुलासा करावा लागणार आहे.
६ जानेवारी २०२० रोजी अमेरिकेचे संसदभवन असलेल्या कॅपिटॉलमध्ये ट्रम्प समर्थकांनी दंगल घडवली आणि विजयी डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. या दंगलीची विशेष समितीमार्फत चौकशी सुरू आहे. या ‘हाऊस जानेवारी ६ कमिटी’ने शुक्रवारी एकमताने ट्रम्प यांना ‘सुपिना’ (चौकशीला हजर राहण्याची नोटीस) बजावला. विशेष म्हणजे एरवी गुन्हेगारी प्रकरणांसाठी वापरण्यात आलेली भाषा या ‘सुपिना’मध्ये वापरली आहे.‘अनेक मदतनीस आणि अधिकाऱ्यांनी वारंवार सांगूनही आधीच ठरल्याप्रमाणे पराभव मान्य करायची ट्रम्प यांची तयारी नव्हती,’ असे समितीने म्हटले आहे. ‘६ जानेवारीच्या मुख्य सूत्रधाराकडून शपथेवर जबाब आपण घेतलाच पाहिजे,’ असे समितीच्या उपाध्यक्षा रिपब्लिकन सदस्य लिझ चेनी यांनी म्हटले.
समितीने पुराव्यादाखल अनेक नव्या चित्रफिती सादर केल्या. ‘ट्रम्प यांनी जमावाला मागे हटण्यास नकार दिल्यामुळे अधिक मदतीची आवश्यकता आहे,’ असे कॅपिटॉलमध्ये अडकलेले सदस्य बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाऊस स्पिकर नॅन्सी पेलोसी यांच्या एका चित्रफितीचाही यात समावेश आहे. नजीकच्या व्हर्जिनिया राज्याच्या गव्हर्नरना अधिक कुमक पाठवण्याची विनंती त्या करत असल्याचे दिसते.
ट्रम्प यांचा विरोध
ट्रम्प यांनी या समन्सची खिल्ली उडवली आहे. चौकशीला हजर राहण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले नसले तरी आपल्याला आधी विचारले नसल्याबद्दल समिती सदस्यांवर त्यांनी टीका केली. आपल्या समाजमाध्यम खात्यांद्वारे व्यक्त होताना त्यांनी समितीवर तोंडसुख घेतले. त्यामुळे ते या समन्सविरोधात कायदेशीर लढा देतील आणि चौकशीला हजर राहणार नाहीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक प्रकारांनी ते कायदा मोडत आहेत. खरे सांगायचे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना भडकवले आहे. – चित्रफितीमध्ये नॅन्सी पेलोसींचे फोनवरील संभाषण