Swami Prasad Maurya Attacked: उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य हे स्वागतासाठी एका ठिकाणी थांबले असता त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेल्या एका युवकाने त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. मात्र, त्यानंतर या युवकाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य हे बुधवारी रायबरेलीमधून प्रवास करत होते. यावेळी एका ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी काही कार्यकर्ते थांबले होते. तेव्हा स्वामी प्रसाद मौर्य यांना त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालत त्यांचं स्वागत केलं. मात्र, त्याचवेळी त्या ठिकाणी एक युवक हातात पुष्पहार घेऊन आला आणि त्याने स्वामी प्रसाद मौर्य यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. त्याचवेळी या युवकाने जोरात त्यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी लगेचच त्या युवकाला ताब्यात घेतलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्या युवकाला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण गोंधळामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.

ही घटना घडल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली. तसेच समाजवादी पक्षाच्या माजी खासदारानेही या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, या हल्लेखोराने समाजवादी पक्षाच्या एका माजी नेत्याबरोबरही अशाच प्रकारचं कृत्य काही दिवसांपूर्वी केलं होतं असं सांगितलं जात आहे.

या घटनेची माहिती सांगताना सर्कल ऑफिसर अमित सिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “स्वामी प्रसाद मौर्य फतेहपूरला जात होते. येथे त्यांच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम होता. त्यांचे समर्थक येथे उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये दोन व्यक्ती पुष्पहार घेऊन उपस्थित होत्या. या दोघांनी त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. पुढील कारवाई केली जात आहे.”