पुण्यातील कल्याणीनगर भागात महागड्या पोर्श कारने संगणक अभियंते असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडण्याचे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशच्या झाशीमध्येही निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे प्रकरण समोर आले आहे. झाशीच्या सिपरी बाजार परिसरात एका गल्लीतील अरुंद रस्त्यावर फॉर्च्युनर या गाडीने एका ७० वर्षीय वृद्धाला दोन वेळा गाडीखाली चिरडले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. अतिशय थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीखाली चिरडले जात असताना वृद्ध जीवाच्या आकांताने मदतीची याचना करत आहे. मात्र गाडीत बसलेल्या चालकाला मात्र त्याची सुतराम कल्पना नसल्याचे दिसते. चालकाने दोन वेळा या वृद्धाला गाडीखाली चिरडले.

कसा झाला अपघात?

झाशीच्या सिपरी बाजार परिसरात झालेल्या या अपघाताचा चार मिनिटांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्पष्टपणे दिसते की, अतिशय अरुंद रस्त्यावरून एक फॉर्च्युनर गाडी मागे जात आहे. मागे जात असताना एक वृद्ध गाडीखाली येतो. गाडी काही मीटर मागे जात असताना वृद्धाला फरफटत नेते. गाडी पूर्णपणे मागे गेल्यानंतर पुढचे चाक वृद्धाच्या शरीरावरून जाते. त्यानंतर काही सेकंदाच सदर गाडी पुन्हा वृद्धाच्या अंगावर चढवली जाते. यावेळी सदर वृद्ध जीवाच्या आकांताने ओरडत असल्याचे पाहून काही स्थानिक लोक धावून येतात आणि चालकाने केलेल्या कृत्याबद्दल त्याला जाणीव करून देतात. तोपर्यंत काही सेकंद पीडित वृद्ध गाडीखालीच दबलेल्या अवस्थेत असतो. त्यानंतर फॉर्च्युनरचा चालक पुन्हा गाडी मागे घेतो आणि वृद्धाची सुटका करतो.

पीडित ७० वर्षीय वृद्ध यांचे नाव राजेंद्र गुप्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही व्हिडीओमध्येच ते रक्तबंबाळ झाले असल्याचे दिसत आहे. फॉर्च्युनर गाडीचे वजन अडीच टन असल्याचे सांगितले जाते. एवढ्या प्रचंड वजनाचे वाहन दोन वेळा अंगावरून गेल्यामुळे वृद्धाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

या घटनेनंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली, तसेच अपघात करणाऱ्या चालकालाच वृद्धाला रुग्णालयात नेण्यास सांगितले. पोलिसांनी वृद्धाच्या मुलाच्या तक्रारीवरून हलगर्जीपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.