एपी, बोगोटा (कोलंबिया) : अमेझॉनच्या पर्जन्यवनात ४० दिवसांपूर्वी झालेल्या एका लहान विमानाच्या अपघातानंतर बेपत्ता झालेली चार छोटी भावंडे शुक्रवारी जिवंत सापडल्याची माहिती कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोलंबियातील मूळ जमातीमधील या मुलांचा अथक शोध सुरू होता. ही मुले शोधपथकाला एकाकी अवस्थेत आढळली. त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष गुस्टाव्हो पेट्रो यांनी पत्रकारांना दिली. ही मुले म्हणजे माणसाच्या जिवंत राहण्याच्या संघर्षांचे उदाहरण असून इतिहासात त्यांचा दाखला दिला जाईल, असे पेट्रो म्हणाले.
सेस्ना हे एकल इंजिन प्रोपेलर विमान १ मे रोजी भल्या पहाटे इंजिनात बिघाड झाल्यानंतर रडारवरून नाहिसे झाले. त्या वेळी विमानात वैमानिकाव्यतिरिक्त सहा प्रवासी होते. १६ मे रोजी शोध पथकाला हे विमान दाट जंगलात दिसून आले. तेथे तीन जणांचे मृतदेहही आढळले, पण चार लहान मुलांचा मागमूस दिसून आला नव्हता. या चौघांत १३ वर्षे, नऊ वर्षे, चार वर्षे आणि ११ महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. ही मुले आईसह प्रवास करीत होती. त्यांच्या शोधासाठी १५० सैनिक प्रशिक्षित श्वानांसह जंगलात उतरले होते. ही मुले हुईतोतो जमातीची असून त्यातील सर्वात मोठय़ा मुलाला पर्जन्यवनात प्रतिकूल स्थितीत राहण्याबाबत थोडीफार माहिती होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अस्तित्वाच्या खुणा
विमान दुर्घटनास्थळापासून साडेचार किलोमीटरच्या परिघात सैनिकांनी शोधमोहीम राबविली. परिसरात लहान मुलांच्या पावलांचे ठसे, बेबी बॉटल, डायपर आणि खाऊन टाकलेल्या फळांचे काही तुकडे दिसून आले.
त्यामुळे ही मुले जिवंत असावीत, अशी शक्यता शोध पथकाला वाटली. सैनिकांसोबतच्या एका श्वानाने सर्वात आधी ही मुले शोधून काढली, असे राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी सांगितले.