Sebastien Lecornu resignation: फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू (Sebastien Lecornu) आणि त्यांच्या सरकारने सोमवारी राजीनामा दिला आहे. लोकोर्नू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा राजीनामा दिला आहे. फ्रान्समधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राजीनामा दिला असन याचा परिणाम बाजारात देखील पाहायला मिळाला. ज्यामुळे शेअर्स आणि युरो दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मित्रपक्ष आणि विरोधकांनी हे नवीन सरकार पाडण्याची धमकी दिल्यानंतर अनपेक्षितरित्या लेकोर्नू यांनी पदाचा राजीनामा दिला . यानंतर विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा संसदीय निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

लेकोर्नू हे मॅक्रॉन यांचे दोन वर्षांच्या काळातील पाचवे पंतप्रधान ठरले आहेत, ते अवघे २७ दिवस पदावर राहिले. तर त्यांचे सरकार अवघे १४ तास टिकले. ज्यामुळे ते आधुनिक फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात कमी काळ टिकलेले सरकार ठरले आहे. युरो झोनमधील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला फ्रान्स सध्या त्यांच्या आर्थिक व्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, यादरम्यान हा प्रकार घडला आहे.

आता पुढे काय?

२०२२ मध्ये मॅक्रोन पुन्हा निवडून आल्यापासून कोणत्याही पक्षाकडे संसदेत बहुमत नसल्यामुळे फ्रान्समधील राजकारण हे कमालीचे अस्थिर झाले आहे. मॅक्रॉन यांनी गेल्या वर्षी नियोजित वेळेच्या आधी संसदीय निवडणुका (Snap Parliamentary Election) घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे संकट अधिक गडद झाले, कारण या निवडणुकीतून संसद बहुमत येण्याएवजी अधिक विभाजन झाले.

सेंट्रीस्ट राष्ट्राध्यक्ष आता पुन्हा स्नॅप निवडणुका जाहीर करू शकतात, राजीनामा देऊ शकतात किंवा आणखी एका पंतप्रधानांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न करू शकतात.

मॅक्रॉन यांचा कार्यकाळ मे २०२७ पर्यंत आहे आणि त्यांनी गेल्या काही महिन्यांत पहिले दोन पर्याय वारंवार नाकारले आहे. लेकोर्नू यांच्या राजीनाम्यावर त्यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.