नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल दिल्यानंतर, संसदीय पक्षाच्या नेतेपदी संजय राऊत यांच्या जागी गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे पत्र संसदीय कामकाज मंत्रालय व लोकसभा सचिवालयाला दिले जाणार आहे.
लोकसभेतील १८ पैकी १३ खासदार शिंदे गटाकडे असून पक्षाच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती झालेली आहे. राज्यसभेतील संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी हे तीन खासदार मात्र उद्धव ठाकरे गटात आहेत. फुटीपूर्वी संजय राऊत हे शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते होते. आता राऊत यांच्या जागी कीर्तिकर यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शेवाळे यांनी पत्रकारांना दिली.
संसदेतील शिवसेनेचे कार्यालयही शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले असून मंगळवारी तिथे असलेली उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची मोठी छायाचित्रे काढून टाकण्यात आली. त्यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आनंद दिघे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाआधी या कार्यालयाचा वापर दोन्ही गटांकडून होत होता.