महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले असं सांगायचे की विवेकानंद असे संन्यासी आहेत जे भारताच्या आत्म्याचा आवाज जागृत करतील. गांधीजी तेव्हा दक्षिण अफ्रिकेहून आले होते. भारतात येऊन त्यांना फार दिवस झाले नव्हते. मात्र विवेकानंद यांना भेटण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. मात्र महात्मा गांधींची ही इच्छा अपूर्णच राहिली.
स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्यातले समान धागे कुठले?
स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांनी स्वतःवर प्रयोग केले. तसंच या दोघांमधला आणखी एक समान धागा म्हणजे दोघंही मानवता आणि मानवतेची भावना हा विचार प्रमुख मानत होते. स्वामी विवेकानंद यांनी दरीद्र नारायणाची सेवा म्हणजेच गरीबांमध्ये तुम्ही ईश्वराचं दर्शन घ्या असा विचार दिला. तर महात्मा गांधी म्हणायचे की ईश्वराला प्रसन्न करायचं असेल तर सेवेचा मार्ग मानवतेच्या सेवेतून पुढे जातो. गरीब आणि दलित वर्गाची सेवा केली पाहिजे या मताचे महात्मा गांधी होते.
महात्मा गांधींनी काय म्हटलं होतं?
महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे की मी कालीमातेची पूजा, बळीची पूजा, ब्राह्मण समाज यांच्याबाबत भरपूर वाचलं होतं. मी कोलकाता या ठिकाणी वास्तव्य करायचो त्यामुळे मला तिथल्या लोकांचं आयुष्य कसं असतं हे देखील जाणून घ्यायचं होतं. प्रताप चंद्र मजूमदार, देवेंद्रनाथ टागौर, पंडित शिवनाथ शास्त्री यांच्याबाबतही मला जाणून घेण्याची संधी मिळाली. बंगाली लोकांच्या आयुष्यात संगीत अतिशय महत्त्वाचं आहे. मी ब्राह्मण समाजाची अनेक प्रकारची कामं पाहिली आणि माझ्या मनात स्वामी विवेकानंद यांना भेटण्याची इच्छा जागृत झाली. पण आमची भेट होऊ शकली नाही. मला विवेकानंदांना भेटायचं म्हणून मी पायी निघालो. मी त्यांना भेटायला दोन मैल चालतही गेलो. पण तिथे पोहचल्यावर मला समजलं की स्वामी विवेकानंद तिथे नाहीत. स्वामी विवेकानंदांची प्रकृती बिघडली होती आणि ते त्यांच्या निवासस्थानी आहेत. प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांची भेट होणं शक्य नाही हे मला कळलं.
…आणि दोन दिग्गजांची भेट झालीच नाही
यानंतर महात्मा गांधी म्हणतात , जुलै १९०२ मध्ये स्वामी विवेकानंद यांचं निधन झालं आणि माझी आणि त्यांची भेट होऊ शकली नाही. ही भेट झाली नाही याची खंत महात्मा गांधी यांच्या मनात कायम राहिली. १९२१ मध्ये महात्मा गांधी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने बेलूर मठ या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर भाष्य केलं. ते म्हणाले मी स्वामी विवेकानंदांबाबत अनेक गोष्टी वाचल्या आहेत. त्यानंतर त्यांच्याविषयी असलेला आदर हा हजार पटींनी वाढला आहे.
भारतीयांना स्वावलंबनाचे धडे देणारे स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी या दोन्ही दिग्गजांची भेट होऊ शकली नाही. पण भारतीयांचे विचार बळकट करण्यास या दोघांनी खूप मोठा हातभार लावला. महात्मा गांधी आणि विवेकानंद ज्या काळात झाले तो काळ इतिहासातला परिवर्तनाचा काळ ठरला. भारताच्या स्वातंत्र्याचा पाया याच काळात रचला गेला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.