Ganpati Special Train: देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गणेशोत्सव २०२५ साठी तब्बल ३८० गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवा दरम्यान ३८० गणपती विशेष गाड्या चालवल्या जाणार असून भाविक आणि प्रवाशांना उत्सवाच्या काळात सुरळीत आणि आरामदायी प्रवास मिळण्यासाठी भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे महाराष्ट्र आणि कोकणमधील गणेशोत्सवासाठी सर्वाधिक २९६ विशेष गाड्यांची सेवा देणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे देखील गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची सेवा देणार आहे. पश्चिम रेल्वे ५६ गणपती विशेष गाड्या देणार असून कोकण रेल्वे ६ आणि दक्षिण पश्चिम रेल्वे २२ गाड्यांच्या फेऱ्या चालवणार आहे. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

गणपती स्पेशल गाड्यांचा थांबा कसा असेल?

कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वारमणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामठे, सावरदा, अरवली रोड, आडवली रोड, आडरावली रोड, आडरावली रोड, विन्हेरे या ठिकाणी गणपती स्पेशल गाड्यांचा थांबा असेल.

तसेच राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकामा रोड, कुमठा, मुर्डेश्वर, मुकांबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या ठिकाणी गणपती स्पेशल गाड्यांचा थांबा असणार आहे.

दरम्यान, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. याा उत्सवाच्या अनुषंगाने गर्दीला तोंड देण्यासाठी ११ ऑगस्ट २०२५ पासून गणपती विशेष गाड्या धावत आहेत. उत्सव जवळ येताच ही सेवा हळूहळू वाढववण्यात येणार आहे. विशेष गाड्यांचे तपशीलवार वेळापत्रक आयआरसीटीसी वेबसाइट देखील जारी करण्यात आलेलं आहे.