उत्तर प्रदेशातील सितापूर जिल्ह्यात अल्पवयीन तरुणीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी सर्वात आधी पीडित तरुणीच्या भावाला आणि तिच्या मित्राला मारहाण करत पळवून लावलं आणि त्यानंतर १६ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. एका महिलेने पोलीस हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्चला रात्री ९ च्या दरम्यान पीडित तरुणी आपला भाऊ आणि मित्रासोबत जत्रेतून परतत होती. आपण आपल्या आजी-आजोबांच्या घरी जात आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. काही अंतरावर सात जणांनी त्यांचा रस्ता अडवला आणि तरुणीची छेड काढण्यास सुरुवात केली. तरुणीच्या भाऊ आणि मित्राने विरोध केल्यानंतर आरोपींनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर घाबरलेल्या बहिणीच्या मित्र आणि भावाने घटनास्थळावरुन पळ काढला.

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिच्या भाऊ आणि मित्राने पळ काढला तेव्हा आरोपी तिला एका बागेत घेऊन गेले, जिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारलं जाईल अशी धमकीही आरोपींनी दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. इतर चार आरोपींचा शोध सुरु आहे.