‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ नावाने प्रसिद्ध असलेले पर्यावरण आणि जलसंरक्षक राजेंद्र सिंह यांनी गंगा नदीच्या प्रदुषणावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. गंगा नदी आधीपेक्षाही जास्त प्रदुषित झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ”नमामि गंगा योजने’अंतर्गत गंगा नदीचे फक्त सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. गंगा नदी आधीपेक्षाही जास्त प्रदुषित झाली आहे. नमामि गंगा योजनेतून नदीची स्वच्छता किंवा नदीतील प्रदुषित घटक काढण्याऐवजी केवळ नदी परिसरातील सौंदर्यीकरण करण्यापर्यंतच ती मर्यादित राहिली आहे.’, असे सिंह यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, ‘देशातील १६ राज्यातील ३५२ हून अधिक जिल्हे हे दुष्काळाचा सामना करत आहेत. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्रचा यात समावेश आहे. देशातील ९० टक्क्यांहून अधिक छोट्या नदी आटल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.’
राजकीय पक्षांना केवळ सत्तेमध्येच रस
देशातील राजकीय पक्षांवर आरोप करताना राजेंद्रसिंह म्हणाले की, ‘हे पक्ष लोकांना भेडसावणाऱ्या वास्तविक समस्या दूर करण्याऐवजी फक्त सत्तेत येण्यास इच्छुक आहेत. सत्तेत आल्यास हवेच्या गुणवत्तासंबंधित प्रश्न सोडवण्यासाठी पाऊल उचलले जाईल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. राजकीय पक्षांना अजून पर्यावरणाचे महत्व जाणवलेले नाही. कोणताही राजकीय पक्ष जल, पर्यावरण किंवा हवेच्या गुणवत्तेसंबंधीत प्रश्नांना गंभीरपणे घेत नाही.’
लोकांना केले आवाहन
राजेंद्र सिंह यांनी लोकांना आवाहन करताना म्हटले की, ‘लोकांनी अशा नेत्यांना मतदान करावे जे देशातील जल संसाधन आणि नदीच्या स्थितीत बदल आणतील. भारतीय समाजाला धर्म आणि जातीमध्ये विभागू पाहणाऱ्यांना त्यांनी कधीच मत देऊ नये.’