लखनौमधल्या कैसरबाग न्यायालयाच्या परिसरात गँगस्टर संजीव महेश्वरी जीवा याची गोळी घालून हत्या केली गेली आहे. हल्लेखोर वकिलांच्या गणवेशात तिथे आला होता. संजीव महेश्वरी हा मुख्तार अन्सारींचा निकटवर्तीय होता. संजीव जीवा हा भाजपा नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्याकांडामधील प्रमुख आरोपी होता. संजीवला आज (०७ जून) न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
संजीव माहेश्वरी जीवा हा पश्चिम उत्तर प्रदेशमधला कुख्यात गुंड होता. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी हल्लेखोराला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. विजय श्यामा यादव असं या हल्लेखोराचं नाव आहे. तो जौनपूरचा रहिवासी आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
या घटनेनंतर कैसरबाग न्यायालयातील वकिलांसह उत्तर प्रदेशातील वकिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे. वकिलांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हल्लेखोराने एकूण सहा गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. न्यायालयाच्या आवारात अनेक ठिकाणी रक्त सांडलं आहे. भिंतींवरही रक्ताचे डाग पाहायला मिळाले आहेत.
हे ही वाचा >> “अफझल खान किंवा औरंगजेब, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही…”, नगरमधील ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांचा संताप
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वकिलाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी रोज इथे येतो पण आज जे घडलं ते सुरक्षा व्यवस्थेची मान शरमेनं खाली घालणारं होतं. यात एका लहान मुलीला गोळी लागली आहे. तिचे वडील आपल्या मुलीसाठी तळमळत आहेत. न्यायालयात येण्यापूर्वी सुरक्षेसंबंधी तपास केला जातो. आमचीही चौकशी केली जाते. परंतु आता न्यायालयाच्या आवारात शस्त्रे घेऊन लोक येऊ लागले आहेत.