दिल्लीच्या तुघलकाबाद परिसरात शनिवारी सकाळी वायूगळती झाल्याचा प्रकार घडला. तुघलकाबादच्या राणी झासी सर्वोदय कन्या विद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे तब्बल ३०० विद्यार्थीनींना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मात्र, आता या सर्व मुलींची प्रकृती सुखरूप आहे.  शाळेच्या परिसरात असलेल्या एका कंटेनरमधून ही वायूगळती झाली होती. सध्या पोलीस आणि कॅटस टीमने घटनास्थळाचा ताबा घेऊन मदतकार्याला सुरूवात केली  शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायूगळती झाल्यानंतर सुरूवातीला विद्यार्थिनींना डोळ्यात आणि घशात जळजळ होण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर या मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) घटनास्थळाचा ताबा घेत हा संपूर्ण परिसर खाली केला. याशिवाय, अपघात आणि ट्रॉमा पथकांनाही याठिकाणी पाठवण्यात आले होते. दरम्यान, सध्या याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.