बंगळुरूमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. या प्रकरणावर आता भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे भाजप आमदार आणि माजी मंत्री डी. एन. जीवराज म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस सरकारच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र, सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस सरकारने आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. आतापर्यंत संघाच्या ११ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत, असे जीवराज यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना मरताना पाहिले. त्यांच्या हत्यांनंतर गौरी लंकेश यांनीही त्यांच्याविरोधात लिखाण केले. तसे लिखाण त्यांनी केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या. गौरी लंकेश या माझ्या बहिणीसारख्या आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी भाजप आणि संघाविरोधात लिखाण केले ते साफ चुकीचे होते, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जीवराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जीवराज अशा प्रकारचे वक्तव्य कसे काय करू शकतात? गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत, हेच त्यांना सांगायचे आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, शृंगेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर जीवराज यांनी मी असे वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचे ‘द हिंदू’ने वृत्तात म्हटले आहे. सिद्धरामय्या सरकारने याआधी झालेल्या हत्यांच्या प्रकरणांत योग्य तपास करून आरोपींना गजाआड केले असते तर लंकेश यांची हत्या झालीच नसती. मागील काळात झालेल्या हत्यांचा छडा लावण्यात सिद्धरामय्या सरकार अपयशी ठरले आहे, हेच मला म्हणायचे होते. उलट लंकेश यांच्या हत्येचा मी निषेधच केला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. त्यात २१ सदस्य आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल, असे सरकारने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri lankesh murder case karnataka bjp mla dn jeevaraj says if she hadnt written against rss bjp would be alive
First published on: 08-09-2017 at 11:50 IST