टीम इंडियाच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू गौतम गंभीर यांनी नुकताच क्रिकेटच्या पिचवरुन राजकारणाच्या पिचवर प्रवेश केला. भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार म्हणून गौतम गंभीर यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले. मात्र यानंतर लगेचच त्यांच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या आरोप करण्यात आलं असून या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला. या बाबत गंभीर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

गौतम गंभीर यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याच्या आरोप करत त्यांच्याविरोधात ‘आप’ने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर १ मे रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना गौतम गंभीर म्हणाले की उमेदवाराला जेव्हा विकासाचे राजकारण करता येत नाही, त्यावेळी उमेदवार अशा प्रकारचे आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारावर करतो. गेल्या साडे चार वर्षात काहीही काम न केलेल्यांना अशा प्रकारचे आरोप करण्यात धन्यता वाटते. माझ्या वरील आरोपांबाबत निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. कारण तुमच्याकडे विकासकामे करण्याची दृष्टी असेल, तर तुम्ही असल्या आरोपांना फारसे महत्व देत नाही, असे गंभीर यांनी स्पष्ट केले.

गौतम गंभीर यांच्याजवळ राजेंद्र नगर आणि करोल बाग अशा दोन मतदान केंद्रातील ओळखपत्र आहेत, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवार आतिशी यांनी केला आहे. ‘आम्ही या प्रकरणी गौतम गंभीर यांच्याविरोधात तीस हजारी न्यायालयात तक्रार केली आहे. या प्रकरणी त्यांना एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते’, असेही यावेळी बोलताना आतिशी यांनी म्हटले.

दरम्यान, पूर्व दिल्लीमधून गंभीरने शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली. या विरोधात निवडणूक आयोगाकडे इतर पक्षांकडून तक्रार करण्यात आली होती.

त्यानंतर आयोगाने याबाबत गंभीर दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.