वॉशिंग्टन, गाझा : इस्रायल आणि हमासदरम्यान गाझामध्ये ऑक्टोबर २०२३पासून सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केलेल्या २० कलमी शांतता प्रस्तावाचे जगभरातून स्वागत होत आहे. भारतासह चीन, रशिया, अरबी देश आणि मुख्य म्हणजे पॅलेस्टिनींच्या संघटनेने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

यामुळे गाझामध्ये शांतता पुन्हा प्रस्थापित होईल आणि गाझाची फेरउभारणी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी अमेरिका, इस्रायल, पॅलेस्टाईन आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची तयारी असल्याचे फ्रान्स सरकारने एक निवेदन प्रसृत करून स्पष्ट केले. तर आठ अरब आणि मुस्लिमबहुल देशांनी मंगळवारी शांतता प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. जॉर्डन, कतार, संयुक्त अरब आमिराती, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्किये, सौदी अरेबिया, इजिप्तने या शांततेच्या प्रस्तावाचे स्वागत केले.

पॅलेस्टाइन आणि इस्रायलमधील तणाव दूर होण्यासाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना चीनचा पाठिंबा असून, चीन या प्रस्तावाचे स्वागत करीत आहे.

गुओ जिआकुन, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय, चीन

हा संघर्ष संपुष्टात येण्यासाठी ट्रम्प यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना रशियाने कायमच पाठिंबा दर्शविला आहे. या शांततेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी व्हावी आणि पश्चिम आशियात शांतता नांदावी. दिमित्री पेसकोव्ह, रशियन सरकारचे प्रवक्ते

पॅलेस्टाईन सरकार राजी

‘आधुनिक, लोकशाही आणि बिगरलष्करी पॅलेस्टाइन देश व्हावा, अशी आमची इच्छा आहे. विविध पंथ, धर्माचे लोक त्यात असण्यासाठी आणि शांततापूर्ण वातावरणात सत्ताबदल होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे पॅलेस्टाईन सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शांतता प्रस्तावानुसार, नव्याने निवडणुका घेण्याबरोबरच इस्रायलवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना पैसे देण्याची पद्धतही या ठिकाणी बंद होणार आहे. तशा सुधारणा या ठिकाणी करण्यात येणार आहेत.

भीषण आकडेवारी

– मृतांची संख्या ६६ हजारांपेक्षा जास्त

– जखमींची संख्या १ लाख ६८ हजारांपेक्षा जास्त

– मृतांमध्ये महिला व लहान मुलांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त

– गाझामध्ये अजूनही ४८ इस्रायली ओलीस, त्यापैकी किमान २० जण जिवंत असल्याची आशा

– शांतता प्रस्तावानंतर इस्रायली सैन्याचे गाझामध्ये पुन्हा हल्ले, किमान

२० कलमी प्रस्ताव

– मूलतत्त्ववादमुक्त आणि शेजारी देशांना धोका नसलेला गाझा प्रदेश

– गाझातील नागरिकांसाठी पुनर्विकास

– दोन्ही देशांनी प्रस्ताव स्वीकारल्यास तत्काळ युद्धबंदी.

– ७२ तासांत इस्रायलचे सर्व ओलिसांची सुटका, मृतदेहही परत केले जातील.

– ओलिसांच्या सुटकेनंतर इस्रायलकडून २५० पॅलेस्टिनी कैदी आणि १,७०० नागरिकांची सुटका

– हमासचे सदस्य शस्त्र खाली ठेवतील, संघटनेच्या ज्या नेत्यांना गाझाबाहेर जायचे आहे त्यांना जाऊ दिले जाईल.

– गाझा पट्टीला पूर्ण मदत. पायाभूत सुविधा, रुग्णालयांची उभारणी

– संयुक्त राष्ट्रे, रेड क्रिसेन्ट आणि अन्य मदत संघटनांच्या मार्फत गाझामध्ये मदत वितरण

– तात्पुरत्या स्वरुपात अराजकीय पॅलेस्टिनी नागरिकांच्या समितीमार्फत प्रदेशाचा दैनंदिन कारभार, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय गटाकडून समितीवर देखरेख

– गाझाच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी आर्थिक विकास योजना; गुंतवणुकीचे पर्याय, रोजगारनिर्मिती यांचा समावेश

– विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना

– गाझा सोडून जाण्यासाठी कुणावरही दबाव नसेल

– गाझा प्रशासनात हमासचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठलाही सहभाग नसेल; शस्त्रनिर्माण कारखाने, लष्करी साहित्य नष्ट करण्यात येईल. गाझाचे बिगरलष्करीकरण करण्यात येईल.

– हमास या कराराशी प्रामाणिक राहील, अशी हमी प्रादेशिक स्तरावरील भागीदार देतील. नवे गाझा शेजारी देशांना धोका नसेल.

– तात्पुरते आंतरराष्ट्रीय दलाची (आयएसएफ) तैनाती, या दलाकडून स्थानिक पोलिसांना प्रशिक्षण

– इस्रायल गाझावर ताबा ठेवणार नाही किंवा जिंकणार नाही

– ‘हमास’ने हा प्रस्ताव मंजूर करण्यास उशीर केला किंवा नामंजूर केला, तर दहशतवादमुक्त क्षेत्रामध्ये मदतपुरवठा सुरू राहील.

– शांततेसाठी आंतरधर्मीय चर्चा प्रक्रिया

– गाझाचा पुनर्विकास होईल; पॅलेस्टाईनमधील सुधारणा कार्यक्रम नीट राबवल्यावर, लोकांच्या मागणीनुसार पॅलेस्टाईनला मान्यता

– इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये प्रगतिशील सहअस्तित्वासाठी चर्चा

आतापर्यंतचे प्रयत्न

– इस्रायल आणि हमास नोव्हेंबर २०२३मध्ये चार दिवसांच्या युद्धविरामास राजी

– कतार आणि इतर देशांच्या मध्यस्थीने दीर्घ चर्चा झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन युद्धविरामासाठी मंजुरी घेतली.

– नोव्हेंबरच्या करारानुसार, हमासने इस्रायलचे २५० ओलिस ठेवले होते. त्यापैकी ११० जणांना मुक्त केले. इस्रायलने २४०हून अधिक पॅलेस्टिनींना सोडले. युद्धविराम ७ दिवसांपर्यंत वाढला. डिसेंबरपासून इस्रायलकडून पुन्हा संघर्षाला सुरुवात

– मे २०२४ पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला पुन्हा सुरुवात. इजिप्त आणि कतारची अमेरिकेबरोबर चर्चा. तीन टप्प्यांतील कराराला हमासची मंजुरी. गाझामध्ये जल्लोष. इस्रायलचा मात्र युद्धविरामाला विरोध.

– दरम्यान, इस्रायल-हेजबोला यांच्यातील संघर्षाला सुरुवात. इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले. नोव्हेंबर महिन्यात लेबनॉनबरोबर युद्धविराम.

– या वर्षी जानेवारी महिन्यात पुन्हा युद्धविराम. या वेळीही युद्धविरामाचे तीन टप्पे. पहिला टप्पा ४२ दिवसांचा पार पडला. मात्र, नंतर पुन्हा संघर्षाला सुरुवात. इस्रायलवर पॅलेस्टिनींना मदत रोखल्याचे आरोप. अमेरिका-इस्रायलचे हमासवर आरोप.

– २९ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाचा प्रस्ताव. इस्रायलची मान्यता. हमासकडून मंजुरीची अपेक्षा.